कुडाळ मालवण तालुक्यातील ९ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामासाठी १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर

शेअर करा

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मंजुरी

कुडाळ,दि.२४ सप्टेंबर

कुडाळ व मालवण तालुक्यातील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र तलाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसलेल्या तलाठी सजांसाठी नवीन कार्यालयीन इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून एकूण ९ तलाठी कार्यालयांच्या इमारत बांधकामासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यामध्ये कुडाळ तालुक्यातील ७ तर मालवण तालुक्यातील २ तलाठी कार्यालयांचा समावेश आहे. नागरिकांना महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभपणे उपलब्ध व्हाव्यात, तसेच तलाठी व मंडल अधिकारी यांना आवश्यक सुविधा असलेली कार्यालयीन जागा मिळावी, या उद्देशाने ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.

कुडाळ तालुक्यातील गोठोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २३ लाख रुपये, आंब्रड तलाठी कार्यालयासाठी १४ लाख, कुंदे तलाठी कार्यालयासाठी १४ लाख, घोटगे तलाठी कार्यालयासाठी १४ लाख, निरूखे तलाठी कार्यालयासाठी १४ लाख, वर्दे तलाठी कार्यालयासाठी १४ लाख आणि सिंधुदुर्गनगरी ओरोस तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

तर मालवण तालुक्यातील किर्लोस तलाठी कार्यालयासाठी १४ लाख रुपये आणि मसुरे-देऊळवाडा तलाठी व मंडल अधिकारी कार्यालयासाठी २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

या माध्यमातून ग्रामीण भागातील महसूल प्रशासनाला आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असून, तलाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांनाही अधिक चांगल्या सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या कामांसाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे तसेच खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

शेअर करा