कुणकेश्वरात दुसऱ्या श्रावणी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी; पहाटेपासून दर्शनासाठी रांगा

शेअर करा

माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रथम पूजा; राजापूर मित्र मंडळाची २०० भाविकांची पदयात्रा कुणकेश्वरात दाखल

देवगड,दि.२४ ऑगस्ट

श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आज, २४ ऑगस्ट रोजी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे भाविकांनी मोठी गर्दी केली. पहाटे ५ वाजल्यापासूनच श्री कुणकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी प्रथम पूजेचा मान माजी आमदार श्री. वैभव नाईक, कणकवली उपनगराध्यक्ष श्री. सुशांत नाईक, उद्योजक श्री. अतुल रावराणे, उद्योजक श्री. संजय आंग्रे तसेच राजापूरचे शिवभक्त व समाजसेवक श्री. संजय बावधनकर यांना देण्यात आला. प्रथम पूजा झाल्यानंतर मान्यवरांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने मानसन्मान करण्यात आला.

यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री. एकनाथ तेली, उपाध्यक्ष श्री. गणेश वाळके, सचिव श्री. हेमंत वातकर, खजिनदार श्री. उदय पेडणेकर यांच्यासह ट्रस्टचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यांचीही उपस्थिती होती.

श्रावण महिन्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही राजापूर मित्र मंडळाच्या वतीने, श्री. संजय बावधनकर यांच्या सहकार्याने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. सुमारे २०० शिवभक्तांचा सहभाग असलेली ही पदयात्रा आज कुणकेश्वर येथे दाखल झाली आणि भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.

दरम्यान, कोकण तसेच मुंबई प्रांतातील प्रसिद्ध भजनी मंडळांच्या भजनसेवेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत विविध भजनी मंडळांकडून भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये प्रसिद्ध भजनी बुवा श्रीधर मुणगेकर, भगवान लोकरे, रामदास कासले, प्रमोद हर्यान तसेच रायगड येथील बुवा महादेव शहाबाजकर यांच्यासह अनेक भजनी मंडळी सेवा देणार आहेत.

श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांसाठी साबुदाणा खिचडी आणि शेंगदाणा उसळीचा प्रसाद वाटप करण्यात येत आहे. या प्रसाद सेवेसाठी विठ्ठल फणसेकर, भाई नरे, दीपक हिर्लेकर, गोपाळ वाळके यांच्यासह दानशूर देणगीदारांचे सहकार्य देवस्थान ट्रस्टला लाभले आहे.

भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन, प्रसाद वाटप आणि इतर आवश्यक सोयी-सुविधांचे योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

शेअर करा