संतोष कोदे यांची माहिती
मालवण,दि.०६ सप्टेंबर
मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नाने आचरा जिल्हा परिषद विभागातील विविध मूलभूत सुविधा व विकासकामांना चालना देण्यासाठी जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत तब्बल ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून आचरा विभागातील दहा महत्त्वाची विकासकामे मार्गी लागणार असून, निधी मंजूर करून दिल्याबद्दल शिवसेना विभागप्रमुख संतोष कोदे यांनी आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे आभार मानले आहेत.
मंजूर निधीतून आचरा जि. प. विभागातील त्रिबक आरेकरवाडी मळ्याकडे जाणारी पायवाट तयार करणे, वायंगणी पाटवाडी ते भटवाडी रस्त्याचे डांबरीकरण, वायंगणी नाका ते पाठवाडी रस्त्याचे डांबरीकरण, पळसंब गावठाणवाडी गोलतकर घर ते साकवापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण, बांदिवडे पावणाई मंदिर ते रायकरवाडी रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, चिंदर बाजारपेठ नागोचीवाडी येथे स्मशानशेड बांधकाम, आचरा बंदर मुख्य रस्ता ते मेराशेवाडी मार्गाचे खडीकरण व डांबरीकरण, आचरा पारवाडी सारमघर ते शिरसेकरघर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, आचरा ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण तसेच आचरा मच्छी मार्केट इमारतीची दुरुस्ती अशी दहा कामे करण्यात येणार आहेत. प्रत्येक कामासाठी ५ लाख रुपये, असा एकूण ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आचरा विभागातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते व नागरी विकासाला प्राधान्य देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संतोष कोदे यांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले. विकासकामांना मंजुरी मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख विनायक बाईत आणि जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी यांनीही महत्त्वपूर्ण पाठपुरावा केल्याचे कोदे यांनी सांगितले.
आचरा विभागातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन आगामी काळातही विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वासही संतोष कोदे यांनी व्यक्त केला.