विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिकृती व विविध स्पर्धांचे प्रदर्शन
मालवण,दि.१३ ऑक्टोंबर
मालवण एज्युकेशन सोसायटी संचालित अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल आणि ना. अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण यांच्या वतीने स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा २०२६ चे आयोजन बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. यंदा विज्ञान जत्रेचे सातवे वर्ष असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनवृत्ती आणि नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या विज्ञान जत्रेचे उद्घाटन स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. शैलेश जयवंत खांडाळेकर यांच्या हस्ते सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे सदस्य जी. व्ही. सामंत असतील. यावेळी सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य व एम. ई. एस. मालवणचे ज्येष्ठ सदस्य श्री. दिगंबर मनोहर सामंत तसेच मालवण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री. विजय प्रभाकर कामत हे सन्माननीय मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते उद्घाटनाने, त्यानंतर स्वागतगीत, प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांच्या मनोगताने होणार आहे. मुख्याध्यापक एल. बी. वळंजू प्रास्ताविक करणार असून, अध्यक्षीय भाषणानंतर आभार प्रदर्शनाने उद्घाटन सोहळ्याची सांगता होईल.
विज्ञान जत्रेच्या निमित्ताने सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच अन्य वैज्ञानिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ मिळण्याबरोबरच विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग आणि प्रतिकृतींच्या माध्यमातून समजून घेण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे.
दुपारी १ ते २ या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता पारितोषिक वितरण सोहळा आणि समारोप होणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणे, जिज्ञासू वृत्ती वाढविणे आणि नव्या वैज्ञानिक संकल्पनांची ओळख करून देणे या दृष्टीने स्व. प्रा. वसंतराव अभ्यंकर विज्ञान जत्रा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या विज्ञान जत्रेला विद्यार्थी, पालक आणि विज्ञानप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.