महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे आवाहन
मालवण,दि.०१ ऑक्टोंबर
केंद्र शासनाने ऑनलाइन UPI व्यवहारांवर ०.०४% कर आकारण्याचा प्रारूप निर्णय घेतल्याने य निर्णयाविरोधात राज्यभरातील व्यापारी बांधवांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर रोजी ‘नो युपीआय डे’ पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर व इतर व्यापारी संस्था यांची आज महत्वपूर्ण बैठक होऊन चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे या उपक्रमाला पाठिंबा दर्शविण्यात आला. व्यापाऱ्यांची एकजूट आणि सामूहिक भूमिका सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘नो युपीआय’ उपक्रमात सर्व व्यापारी बांधवानी सहभागी होऊन पाठिंबा द्यावा, असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी या बैठकीत केले.
व्यापारी बांधवांनी एक दिवस युपीआय व्यवहारांना विराम देऊन या उपक्रमात सहभागी व्हावे. व्यापाऱ्यांनी २ ऑक्टोबर या दिवशी युपीआय पेमेंटऐवजी कॅश पेमेंटचा पर्याय वापरावा. याबाबत व्यापाऱ्यांनी सोशल मीडियावर नो युपीआयचा संदेश प्रसारित करून व्यापारी एकजुटीचा आवाज बुलंद करावा, असे आवाहन देखील या बैठकीत करण्यात आले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स युपीआयच्या विरोधात नाही. मात्र व्यापाऱ्यांवर मर्चंट डिस्काउंट रेट चा अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, ही आमची भूमिका आहे. हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता नसून, भविष्यात व्यापाऱ्यांच्या हिताशी संबंधित निर्णय घेताना व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचे मत विचारात घेतले जावे, यासाठीची सामूहिक भूमिका आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सवचे अध्यक्ष रवींद्र माणगावे, कोकण विभाग उपाध्यक्ष डॉ. संतोष राणे,ट्रस्ट बोर्डचे आशिष पेडणेकर, कोकण विभागाचे माजी उपाध्यक्ष डॉ. दिपक परब, सिंधुदुर्गचे गव्हर्निंग कॉन्सिल सदस्य अॅड. नकुल पार्सेकर, राजन नाईक, विजय केनवडेकर, मनोज वालावलकर, विशाल कामत, कुणाल वरस्कर, मिलिंद प्रभू यांनी दिली.