मालवण ,दि.०९ सप्टेंबर
जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झालेल्या पोईप खालची पालववाडी येथील संशयीत प्रकाश रामचंद्र पालव (वय ६४ वर्ष) याची मालवण न्यायालयाने सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.
या प्रकरणातील फिर्यादी दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६. ३० वाजता खालची पालववाडी येथील त्याच्या घरात असताना फिर्यादीचा चुलतभाऊ प्रकाश रामचंद्र पालव याने जमीनीच्या वादातून फिर्यादीच्या घरात जबरदस्तीने घुसून फिर्यादीच्या वडीलांना ढकलून दिले. तेव्हा फिर्यादी मध्ये पडला असता संशयीताने लाकडी दांड्याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारहाण केल्याने फिर्यादीचा हात फ्रॅक्चर झाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे फिर्यादीला रुग्णालयात दाखल दाखल करण्यात आले. त्यानंतर मालवण पोलिसांनी याबाबत फिर्यादीची तक्रार नोंद करून संशयीतांविरूद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११५(१), ११८ (१), ११८ (२), ३३३, ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला. मालवण पोलिसांनी संशयिताला त्वरीत ताब्यात घेतले. संशयितास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी मालवण यांच्या न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर अधिक तपासासाठी न्यायालयाने संशयिताची दि. ७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलीसांनी संशयिताला पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयीतांला न्यायालयीन कोठडी मंजूर केली. त्यानंतर संशयीतातर्फे न्यायालयात जामीनअर्ज दाखल करण्यात आला. जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. न्यायालयाने संशयिताची रक्कम रु. १५००० च्या सशर्त जामीनावर मुक्तता केली. संशयीतातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई व ॲड. अंबरीष गावडे यांनी काम पाहिले.