मालवण,दि.२२ ऑगस्ट
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व क्रीडा विकासाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाला १० पंखे, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल आणि व्हॉलीबॉल नेट असे साहित्य भेट देण्यात आले. या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार असून विद्यालयातील शैक्षणिक तसेच क्रीडा वातावरण अधिक सुविधायुक्त होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर, खजिनदार सौगंधराज बादेकर, तसेच ट्रस्टचे सदस्य राजीव बादेकर, निनाद बादेकर, श्रीराज बादेकर व दैवज्ञ बादेकर तसेच भंडारी एज्यूकेशन सोसायटीचे लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, प्रा. पवन बांदेकर व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पवन बांदेकर यांनी केले. लोकल कमिटी सेक्रेटरी श्री. कवटकर यांनी ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर यांचे शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. ट्रस्ट तर्फे सौगंधराज बादेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उपलब्ध क्रीडा साहित्याचा योग्य वापर करून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करावी आणि विद्यालयाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
मुख्याध्यापक श्री. बनसोडे यांनी अध्यक्षीय मनोगतात या साहित्य भेटीबद्दल भंडारी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने कै. अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. दळवी सर यांनी केले. या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.