मालवण : कट्टा महाविद्यालयात “करिअर कट्टा” चा इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम संपन्न…

शेअर करा

मालवण,दि.०७ ऑगस्ट

कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करिअर कट्टा’ विभागाअंतर्गत ‘इंडक्शन अवेअरनेस प्रोग्राम’ चे (Induction Awareness Program) यशस्वी आयोजन करण्यात आले. करिअर कट्टा या उपक्रमाचे स्वरूप, त्याचे विद्यार्थ्यांसाठी असणारे फायदे स्पष्ट करणे व करिअर कट्टा उपक्रमाची नोंदणी प्रक्रिया विद्यार्थ्यांना सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

करिअर कट्टा हा विभाग गेली ५ वर्षे सतत युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. ‘करिअर कट्टा’ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख मार्गदर्शनासोबतच स्वतःच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. या कार्यक्रमप्रसंगी करिअर कट्टा च्या महाविद्यालयीन समन्व्यक प्रा. श्रुती कुंभार यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा विभागाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या काळात विद्यार्थ्यांसमोर असलेली आव्हाने स्पष्ट करून त्यावर करिअर कट्टा च्या मदतीने कशा प्रकारे तोडगा काढता येईल याबद्दल ही सविस्तर मार्गदर्शन केले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्मा. श्री ध्वजेंद्र मिराशी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “आजच्या स्पर्धात्मक आणि आधुनिक युगात केवळ पदवी शिक्षण पुरेसे नसून कौशल्य विकास आणि योग्य करिअर मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. ‘करिअर कट्टा’ हे एक असे व्यासपीठ आहे, जे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनवते. विद्यार्थ्यांनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा.”

सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपास्थित होते. कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेबद्दल संस्थेचे अध्यक्ष, संस्था सचिव, सर्व संस्था पदाधिकारी व संचालक यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.

शेअर करा