मालवण,दि.२३ ऑगस्ट
गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या जिल्हा सर्वसाधारण सभेत संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र खोबरेकर, तर सरचिटणीसपदी महेंद्र पराडकर यांची निवड करण्यात आली.
मालवण येथील गाबीत समाज नागरी पतसंस्था हॉलमध्ये नुकतीच गाबीत समाज सिंधुदुर्ग संस्थेची बैठक झाली. यावेळी नूतन विश्वस्त मंडळ व कार्यकारी मंडळाची निवड जाहीर करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीत मेघनाद धुरी व पूजा सरकारे – सहचिटणीस, पांडुरंग कोचरेकर – खजिनदार, दीपक तारी – हिशोब तपासनीस, तर डॉ. प्रमोद कोळंबकर, शंकर ऊर्फ दादा वाघ, संजय बांदेकर, स्नेहा केरकर, सेजल परब, पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी, संजय केळुस्कर, मिथुन मालंडकर आणि नरेश हुले यांची विश्वस्त सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी मालवण नगरपालिकेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर व उपाध्यक्ष संजय पराडकर यांच्या हस्ते चंद्रशेखर उपरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड तालुका सरचिटणीस लक्ष्मण तारी, बाळा मुणगेकर, रमेश तारी यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
देवगड तालुका गाबीत संघटनेचे अध्यक्ष संजय पराडकर यांनी उपरकर यांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या तीन वर्षांत जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम केले असून, यापूर्वीही सुमारे २५ वर्षे जिल्हा संघटक म्हणून त्यांनी योगदान दिल्याचे त्यांनी सांगितले.
गाबीत समाज हा प्रामुख्याने मत्स्यव्यवसाय व पर्यटनाशी जोडलेला असून, पर्यटन संस्था, रापण मच्छिमार संघटना, महिला मच्छिमार संघटना, सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, मेळावे, विविध आंदोलने, मोर्चे तसेच गाबीत महोत्सवाच्या माध्यमातून समाजाच्या विविध प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे.
निवडीनंतर बोलताना जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर म्हणाले, गणेश चतुर्थीनंतर जिल्हा कार्यकारी मंडळासह गाबीत समाजाची वस्ती असलेल्या किनारपट्टीवरील तसेच इतर गावांमध्ये संपर्क दौरा आयोजित करून संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.
शेवटी सरचिटणीस महेंद्र पराडकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.