आश्वासनानंतर कामगार कामावर हजर
मालवण ,दि. १६ ऑगस्ट
सणासुदीचा काळ असताना एक महिन्यांचा पगार थकीत राहिल्याने आज सकाळी मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामबंद आंदोलन सुरु केले. यावेळी आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेत ठेकेदाराशी चर्चा केली तर मालवणच्या नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर आणि उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी कामगारांची मागणी लक्षात घेत पगार देण्याची ग्वाही दिल्याने सुमारे पाच तास चाललेले हे कामबंद आंदोलन कामगारांनी मागे घेत पुन्हा कामावर परतले.
मालवण नगरपालिकेतील कंत्राटी स्वच्छता कामगारांनी आज सकाळी सात वाजल्यापासून अचानकपणे काम बंद आंदोलन केले. ठेकेदाराकडून एक महिन्याचा पगार मिळालेला नसल्याचे कामगारांनी सांगत सणासुदीच्या काळात पगार वेळेत मिळत नसल्याने आपली नाराजी व्यक्त केली या आंदोलना विषयी कळताच उबाठा शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनी नगरपालिकेत जाऊन कामगारांची भूमिका जाणून घेत आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी कामगारांनी ठेकेदाराकडून आमच्या बँक खात्यावर पगारापोटी पाठवलेली काही रक्कम रोख स्वरूपात परत घेतली जात असल्याचा आरोप केला. यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर यांनीही कामगारांना जो ठरलेला पगार आहे तेवढा पगार मिळालाच पाहिजे, तसेच जी रक्कम परत मागितली गेली ती रक्कम देखील कामगारांना मिळाली पाहिजे, असे सांगत या प्रकाराबाबत मुख्याधिकाऱ्यांनाही निवेदन देणार असल्याचे सांगितले.
यावेळी आरोग्य व स्वच्छता सभापती सौ. पूनम चव्हाण यांनी नगरपालिकेत धाव घेत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.
व आवश्यक त्या सूचना दिल्या
या दरम्यान नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीही नगरपालिकेत दाखल होत कामगारांची भूमिका जाणून घेतली. यानंतर झालेल्या चर्चेतून कामगारांना थकीत पगार देण्याचे आश्वासन दिल्याने कामगारांनी हे कामबंद आंदोलन मागे घेतले.