मालवण: सोनेतारण योजनेतील फसवणूक प्रकरणी ग्राहकांचा वित्तीय संस्थेत ठिय्या

शेअर करा

मालवण,दि.११ ऑगस्ट

मालवणातील एका वित्तीय संस्थेकडून सोने तारण योजनेत अनेक ग्राहकांची आर्थिक फसवणूक व गैरव्यवहार झाल्याप्रकरणी या संस्थेचे ग्राहक गेले काही दिवस आक्रमक बनले असताना सोमवारी या ग्राहकांनी सदर संस्थेच्या कार्यालयात ठिय्या मांडत आपल्या विविध मागण्यांचा अर्ज संस्थेला स्वीकारण्यास आणि त्याची पोच देण्यास भाग पाडले.

मालवणातील संबंधित वित्तीय संस्थेकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत आपले सोने परत मिळविण्यासाठी या ग्राहकांनी एकत्र येऊन गेले काही दिवस संस्थे विरोधात लढा उभारला आहे. सर्व ग्राहकांचे जबाब घेऊन त्याची एकत्रित तक्रार पोलीस स्थानकात दाखल करण्याच्या पवित्र्यातही ग्राहक आहेत. आज सकाळपासून या ग्राहकांनी आपल्या विविध मागण्यांचा अर्ज संस्थेला सादर करण्यासाठी संस्थेत गर्दी केली. प्रत्येक ग्राहकाच्या सोने तारण व्यवहाराची सखोल माहिती मिळावी, सोने कुठे ठेवले आहे हे सांगावे अशा मागण्या या अर्जात करण्यात आल्या होत्या.

मात्र, संस्था व्यवस्थापनाकडून अर्ज स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याने यावेळी ग्राहक आक्रमक बनल्याने ग्राहक व संस्था व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे अर्ज स्वीकारेपर्यंत ग्राहकांनी संस्थेच्या कार्यालयात ठिय्या मांडला. अर्ज स्वीकारावेत ही मागणी ग्राहकांनी लावून धरल्याने अखेर संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर संस्था व्यवस्थापनाने ग्राहकांचे अर्ज स्वीकारले. यावेळी मोठ्या संख्येने ग्राहक उपास्थित होते.

शेअर करा