मालवण : कमी पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून शेतीची पाहणी

शेअर करा


पोईप विभागातील शेतकऱ्यांच्या समस्या घेतल्या जाणून घेतल्या

मालवण दि प्रतिनिधी

जिल्ह्यात यंदा पावसाची अनियमितता राहिल्याने शेतीपिकांवर प्रतिकूल परिणाम झाला असून, काही भागांमध्ये विहिरींच्या पाणीपातळीतही घट होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मालवण तालुक्यातील पोईप येथे भेट देऊन शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भातपिकाची सद्यस्थिती, पिकांची वाढ, पाण्याची उपलब्धता तसेच पावसाअभावी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
जिल्हाधिकाऱ्यांनी परिसरातील विहिरींचीही पाहणी करून त्यांच्या पाणीपातळीचा आढावा घेतला. शेतीसाठी उपलब्ध असलेले जलस्रोत, सध्याचा पाणीसाठा आणि आगामी काळातील पाण्याची गरज याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधत पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडल्या. भातशेतीच्या ऐन वाढीच्या काळात पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, काही ठिकाणी भातपिके करपण्याच्या स्थितीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून, पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीचे नियोजनही विस्कळीत झाल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली.
पावसाअभावी विहिरींच्या पाणीपातळीत घट होत असल्याने सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनत आहे. काही भागांत भविष्यात पिण्याच्या पाण्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे स्थानिक जलस्रोतांची स्थिती आणि उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी पावसाच्या अनियमिततेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची प्रशासनाकडून गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील शेतीपिकांची स्थिती, पर्जन्यमान, जलस्रोतांची उपलब्धता आणि पावसाअभावी झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे सादर करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत मिळावी यासाठी वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे शासनाकडे मागणी करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्थानिक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यासाठी महसूल, कृषी आणि संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे, तहसीलदार मालवण गणेश लव्हे, मंडल अधिकारी, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच शेतकरी उपस्थित होते.

शेअर करा