मालवणात ठाकरे शिवसेनेकडून ‘निष्ठेची साठी’ साजरी 🚩🤝🏛️
मालवण, दि. १९ जून
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ६० वर्षांपूर्वी ज्या विचारांची पेरणी केली, त्या विचारांशी प्रामाणिक राहून आज आपण इथे ‘निष्ठेची साठी’ साजरी करत आहोत. सध्या काही खासदार आणि नेते पदे व स्वार्थासाठी पक्ष सोडून गेले, फुटले असतील. पण खासदार फुटले म्हणून शिवसेना संपत नाही. शिवसेना ही कोणत्याही नेत्यावर नाही, तर रक्ताचे पाणी करून पक्ष उभा करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर आणि जनतेवर चालते. नेते जातात, पण मतदार आणि सामान्य शिवसैनिक कुठेही जात नाही, तो आजही मातोश्रीशी आणि उद्धव ठाकरेंशी एकनिष्ठ आहे,” असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी येथे केले.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन सोहळा मालवण येथील ठाकरे शिवसेना शाखेत उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेत सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या वतीने “निष्ठेची साठी” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पक्षाशी कठीण काळातही एकनिष्ठ राहिलेल्या ज्येष्ठ आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा शाल व श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले, आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि तेवढाच आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. आज ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार आपण केला, त्यांनी कठीण काळात पक्षाला सांभाळले आहे. त्यांच्याच प्रेरणेने आपल्याला पुढे जायचे आहे. आता आपल्याला रडत बसायचे नाही, तर लढायचे आहे. घाबरायचे काहीच कारण नाही, अधिक जोमाने काम करायचे आहे. मालवणच्या प्रत्येक गावागावात, प्रत्येक घरात जाऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद आपल्याला दाखवून द्यायची आहे. पक्ष संघटना दुप्पट वेगाने वाढवणे, हीच बाळासाहेबांना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेली खरी गुरुदक्षिणा ठरेल.
काही लोकप्रतिनिधी फुटले असले, तरी तळागाळातील सामान्य मतदार आजही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, त्यामुळे न डगमगता पक्ष संघटना अधिक जोमाने वाढवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्यासह शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक मंदार ओरसकर, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, रश्मी परुळेकर, पूजा करलकर, दीपा शिंदे, रुपा कुडाळकर, नगरसेविका अनिता गिरकर, माधवी प्रभू, सिद्धेश मांजरेकर, उमेश मांजरेकर, किशोर गावकर, राजा शंकरदास, रवी तळाशीलकर यांच्यासह तालुक्यातील अनेक ज्येष्ठ शिवसैनिक, युवासेना पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.