मालवण : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम

शेअर करा

मालवण ,दि.२९जुलै

महाराष्ट्राच्या सागरी किनारपट्टीवरील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि माशांच्या विविध प्रजातींना प्रजोत्पादनासाठी अनुकूल वातावरण मिळावे, यासाठी राज्यात पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. पावसाळा हा बहुतांश सागरी माशांचा प्रजोत्पादनाचा प्रमुख काळ असल्याने या काळात मासेमारी केल्यास मत्स्यसंपत्तीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे राज्याच्या सागरी हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी कायम राहणार आहे, अशी माहिती सहआयुक्त मत्स्यव्यवसाय (सागरी) महेश देवरे यांनी दिली.

शासन आदेशानुसार महाराष्ट्राच्या जलधी क्षेत्रात किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांपर्यंत सर्व यांत्रिक व यंत्रचलित नौकांसाठी १ जून २०२६ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मासेमारीवर पूर्णपणे बंदी लागू आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात १ जून २०२६ ते ३१ जुलै २०२६ मासेमारी बंदी घोषित करण्यात आली होती. त्यामुळे या भागात १ ऑगस्ट २०२६ पासून मासेमारी करण्यास केंद्र सरकारकडून कोणतेही निर्बंध लागू असणार नाहीत.

राज्यातील सर्व पात्र मासेमारी नौकांनी विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारी करताना एक्सक्लूसिव्ह इकॉनॉमिक झोन रुल्स २०२५ चे तंतोतंत पालन करून शाश्वत पद्धतीने मासेमारी करावी. राज्याच्या १२ सागरी मैलांच्या हद्दीत १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची मासेमारी करण्यास पूर्ण मनाई आहे. बंदीच्या काळात राज्याच्या जलधी क्षेत्रात अनधिकृतपणे मासेमारी करताना आढळून आल्यास, ‘महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, १९८१ (सुधारणा २०२१)’ मधील तरतुदींनुसार संबंधित नौकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मत्स्यव्यवसायाचे शाश्वत भविष्य, मत्स्यसाठ्याचे संवर्धन आणि पारंपरिक मच्छिमारांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी सर्व मच्छिमारांनी नियमांचे पालन करावे आणि मत्स्यव्यवसाय विभागास सहकार्य करावे, असे आवाहन सह आयुक्त महेश देवरे यांनी केले आहे.

शेअर करा