योगज्योती योगा ग्रुपच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची योग प्रात्यक्षिके; निरोगी जीवनाचा दिला संदेश.
मालवण,दि. २१ जून
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमध्ये योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मालवण मधील योगज्योती योगा ग्रुपच्या सौ दीपा वनकुद्रे, कुमारी पूजा वनकुद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके केली.
यावेळी दीपा वनकुद्रे यांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना योगाचे महत्व पटवून दिले. सध्याच्या स्पर्धेच्या व ताणतणावाच्या काळात विद्यार्थ्यांनी नियमित योगा केल्यास मन शांत राहण्यास तसेच शरीर निरोगी राहण्यास मदत होईल, असे दीपा वनकुद्रे यांनी सांगितले. यावेळी सर्वांगासन, पवनमुक्तासन, वक्रासन, कर्णधनुरासन, भुजंगासन, त्रिकोणासन, ताडासन, वृक्षासन आदी विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, शिक्षक आर. बी. देसाई सौ सरोज बांदेकर, एस ए अवसरे तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.