दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी मालवणात दाखल

शेअर करा

मालवण,दि.१६ जुलै

आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून दशावतार कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळाला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकार अनुदानात भरघोस वाढ जाहीर केली. कलाकारांची शासन दरबारीं नोंद होऊन त्यांना ओळखपत्रही मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. शुक्रवारी या अधिकाऱ्यांनी मालवण पंचायत समिती येथे उपस्थित राहत मालवण तालुक्यातील दशवतार कलाकरांची नोंदणी केली.

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात दशावतार कलाकारांचे व्यथा ठामपणे मांडल्या. दशावतार कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय मिळवून देण्यात आमदार निलेश राणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या सोबत दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी दशावतार कलाकार नोंदणी करण्यात यावी अशीही भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली. त्यानुसार सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे अधिकारी दशावतार कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

शुक्रवारी सांस्कृतिक कार्य संचालनालय सांस्कृतिक विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक जयश्री घुगे, लेखाधिकारी गायत्री वेजारे, लिपिक सहदेव खैरे मालवण पंचायत समिती येथे दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपसभापती घनश्याम झाड, पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, सचिव विनायक येरागी, सहसचिव विनोद परब, सल्लागार चंद्रकात खोत, खजिनदार नितीन घाडीगावकर, सदस्य भास्कर मुसळे, श्रेयश खोत, दिनेश राऊळ, रुपेश चौकेकर, सुधीर तांडेल, सुहास माळकर, भाई मांजरेकर यांसह दशावतार कलाकार उपस्थित होते.

यावेळी दिवसभरात १०७ दशावतार कलाकारांची नोंदणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, मालवण तालुक्यातील ज्या दशावतार कलाकारांची नोंदणी झाली नाही त्यांनी दशावतार संघटना मालवण तालुका सचिव विनायक येरागी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नोंदणी पुर्ण करावी, असे आवाहन पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा