- सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे विशेष आभार; दशावतार परंपरेच्या संवर्धनासाठी ऐतिहासिक पाऊल असल्याची भावना
मालवण,दि.०९ जुलै
कोकणची कित्येक वर्षांची समृद्ध दशावतार परंपरा टिकवून ठेवण्याचे काम आम्हा कलाकारांनी केले आहे. दशावतारी नाटकात आम्ही जरी राजाची भूमिका करत असलो, तरी खऱ्या आयुष्यात या कलेला कित्येक वर्षे योग्य तो राजाश्रय मिळत नव्हता. मात्र, आमदार निलेश राणे यांनी हा राजाश्रय मिळवून देण्याचे ऐतिहासिक काम केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य देवेंद्र नाईक यांनी पत्रकारांना देताना सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार, आमदार निलेश राणे आणि दत्ता सामंत यांचे विशेष आभार मानले आहेत
महाराष्ट्र राज्य लोककला अनुदान शिफारस समिती सदस्य देवेंद्र नाईक म्हणाले, आमदार निलेश राणे यांनी कालच विधानसभेत सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांच्यासमोर दशावतार कला आणि कलाकारांचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले. या प्रश्नांना वाचा फोडल्यानंतर मंत्री आशीष शेलार यांनीही त्याला सकारात्मक दुजोरा दिला. याबद्दल दशावतार कलाकारांनी विशेष आभार मानल्याचे सांगून श्री. नाईक यांनी कलाकारांवर जेव्हा जेव्हा संकट आले, विशेषतः कोरोनाच्या अत्यंत कठीण काळात, तेव्हा दत्ता सामंत यांनी प्रत्येक कलाकाराला आणि त्यांच्या कुटुंबाला अन्नधान्यापासून ते आर्थिक मदतीपर्यंत सर्वतोपरी पुरवठा केला. संकटसमयी पाठीशी राहणारे ते आमचे खरे पाठीराखे आहेत, अशा शब्दांत कलाकारांनी भावना व्यक्त केल्या.