मालवण : डास प्रतिबंधात्मक उपाय व त्वरित उपचार घेणे महत्त्वाचे

शेअर करा

डेंग्यू आणि मलेरिया तापसरीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेकडून नागरिकांना आवाहन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण शहर व परिसरात सध्या डेंग्यू व मलेरियाचे रुग्ण सापडून येत असल्याने या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावयाची काळजी व करावयाचे उपाय याबाबत आरोग्य यंत्रणेकडून आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी डास प्रतिबंधक उपाययोजना करतानाच ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.

डेंग्यू आणि मलेरिया हे दोन्ही तापाचे आजार डास चावल्यामुळे होतात. डेंग्यू ताप एडीस डास चावल्याने होतो. हा डास दिवसा चावतो आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतो. तर मलेरिया ताप अनोफेलिस डास चावल्याने होतो. हा डास रात्री चावतो. या दोन्ही तापाची लक्षणे सारखीच असून तीव्र ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थंडी वाजून ताप येणे, डोळ्यांच्या मागे दुखणे अशी लक्षणे रुग्णास दिसून येतात.

डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे महत्त्वाचे

डेंग्यू व मलेरिया तापापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंध हाच महत्वाचा उपाय आहे. हे ताप डासांमुळे होत असल्याने डासांची उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे सर्वात महत्वाचे आहे. अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होत असते. त्यामुळे घरात, टेरेसवर, कुंडीत, टायरमध्ये, नारळाच्या करवंटीत पाणी साचू देऊ नये. दर ८ दिवसांनी कुलर, पाण्याच्या टाक्या, हौद स्वच्छ करावेत. पाणी झाकून ठेवावे, पिण्याचे पाणी, वापराचे पाणी नेहमी झाकण लावून ठेवावे. डासांपासून संरक्षणासाठी रात्री झोपताना मच्छरदाणी वापरावी, पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालावेत, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. मच्छर अगरबत्ती, स्प्रे, क्रीम यांचा वापरा करावा, खिडक्यांना जाळी लावावी. तसेच घर व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, घराच्या आजूबाजूला कचरा साचू देऊ नये. ग्रामपंचायत अथवा नगरपालिकेच्या डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेत सहकार्य करावे, अशा सूचना आरोग्य यंत्रणेकडून करण्यात अळ्या आहेत.

ताप आल्यास काय करावे?

ताप आल्यास स्वतःहून औषध घेऊ नये, ताबडतोब जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र / सरकारी दवाखान्यात जाऊन रक्त तपासणी करून घ्यावी. डेंग्यू- मलेरिया तपासणी आणि उपचार सरकारी दवाखान्यात मोफत आहेत, त्यामुळे ताप आल्यास वेळ न दवडता त्वरित रक्त तपासणी व उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

शेअर करा