मालवण,दि.१० सप्टेंबर
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा संमिती, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशानुसार दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर), मालवण येथे शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका विधी सेवा समिती, मालवण आणि तालुका बार असोसिएशन, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय लोकअदालत आयोजित केली आहे.
या लोकअदालतीत न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी स्वरुपाची प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याची संधी पक्षकारांना मिळणार आहे.
सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, स्वायत्त संस्था तसेच ग्रामपंचायतींकडील वादपूर्व प्रकरणांचाही यात समावेश करण्यात आला आहे. ज्या पक्षकारांना आपली प्रकरणे आपापसातील चर्चेतून व तडजोडीने मिटवायची आहेत, त्यांनी ती तालुका विधी सेवा समिती, मालवण या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
वादपूर्व चर्चेद्वारे प्रकरणे निकाली काढू इच्छीणाऱ्या पक्षकारांनी संबंधित दिवशी न्यायालयात उपस्थित राहून लोकअदालतीच्या माध्यमातून आपले वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), मालवण तथा तालुका विधी सेवा समिती, मालवणचे अध्यक्ष एम. के. फकिह यांनी केले आहे.