मालवण शहर विकासासाठी आणलेल्या निधीतील एक रुपयाही वाया जाता नये – आम. निलेश राणे

शेअर करा

मालवण, दि. १८ जून*

मालवण शहराच्या विकासासाठी आणलेला निधी खर्ची पडला पाहिजे, निधीतील एक रुपयाही वाया जाता कामा नये, निधी कोणा ऐऱ्यागैऱ्यांच्या हाती जाता कामा नये, यासाठी नगराध्यक्षानी आपल्या अधिकारांचा वापर करून कारभार चालवावा, असे सूचक विधान मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

मालवण शहरातील महत्त्वपूर्ण पर्यटन व सांस्कृतिक स्थळांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे १३ कोटी रुपयांच्या निधीतून हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी आम. राणे हे बोलत होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांच्यासह इतर नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी, नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार निलेश राणे म्हणाले, मालवण शहराच्या विकासासाठी आपण कोट्यावधीचा निधी आणत आहोत. याचे सर्व श्रेय उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जाते. नगरोत्थान योजने अंतर्गत मी मालवण शहरासाठी ना. शिंदे यांच्याकडे ज्या ज्या वेळी निधीची मागणी केली तेव्हा त्यांनी कोणताही विलंब न करता कामे मंजूर करत निधी दिला. जे विरोधक गेल्या दहा वर्षात मालवण शहरासाठी काही देऊ शकले नाहीत ते मला दीड वर्षात काय दिले हे विचारतात. मी टिकेकडे लक्ष देत नाही, विरोधक माझ्यावर जेवढी टीका करतील तेवढा मी मोठा होत जाणार असा टोला यावेळी आम. राणे यांनी लगावला.

नाट्यगृहासाठी आणखी साडेतीन कोटी देणार

काही कलाकारांनी मामा वरेरकर नाट्यगृहाचा व्हिडीओ बनवला, त्यातून केवळ नाट्यगृहाची नव्हे तर मालवण शहराची बदनामी झाली. मात्र व्हिडीओ बनवला म्हणून मी नाट्यगृहासाठी निधी आणला असे काही नाहीय. नगरपालिका निवडणुकीतच मी नाट्यगृह एकविसाव्या शतकातील वाटले पाहिजे असे बनविणार असा शब्द दिला होता. तोच शब्द मी पूर्ण करत आहे. नाट्यगृहाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी यापूर्वी १ कोटी मला निधी दिला. तर सुशोभीकरणासाठी १० लाखाचा निधी दिला आहे. हा पहिला टप्पा असून पुढील टप्प्यात नाट्यगृहाच्या अंतिम कामासाठी साडे तीन कोटीचा निधी आपण देणार आहोत. नाट्यगृहाचे काम झाले तरी त्याची देखरेख ठेवणे ही आपली जबाबदारी असून यापूढे कोण व्हिडीओ काढून बदनामी करणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे असेही आम. निलेश राणे म्हणाले.

भुयारी गटारचे काम लवकरच पूर्ण करू – आम. राणे

रॉक गार्डन मध्ये नवीन काहीतरी करण्याचा आपला प्रयत्न आहे. मालवण शहरा कचरा मुक्त करण्यासाठी वाटेल तेवढा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण तयार आहोत, कचरा दिसणार नाही अशी उत्तम व्यवस्था मालवणात निर्माण करू, असेही आम. राणे यांनी सांगितले. तसेच शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी कुंभारमाठ जरीमरी ते आडारी असा पर्यायी रस्ता होणार असून यां रस्त्याच्या भुसंपादनासाठी लागेल तेवढा निधी आपण देऊ. तसेच देवबाग सह मालवण किनारपट्टीवर बंधारा उभारणीसाठी सुमारे २५० कोटी रुपये खर्च होणार आहेत. नळपाणी योजनाही लवकरच पूर्ण होईल. तसेच भुयारी गटार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी निधी देऊ, तसेच या कामासाठी ठेकेदार बदलावा लागला तर तोही बदलू, मात्र दर्जेदार काम करून घ्यावे लागेल, असेही आम. राणे म्हणाले.

निधी वाया जाऊ नये – आम. राणे

शहर विकासासाठी मी आणलेला निधी कोणी माझ्या सहज हातात दिलेला नाही. निधी आणण्यासाठी काय करावे लागते हे मला माहित आहे. आमदार म्हणून शहर विकासासाठी शंभर टक्के निधी देणार, मात्र दिलेला निधी खर्ची पडला पाहिजे, एक रुपयाही वाया जाता कामा नये. निधी मध्ये कोणाची भांडणे नको, ठेकेदार कोण, काम कोण करणार याची विचारपूस नको. हा पैसा मालवण शहराचा आहे, तो ऐऱ्यागैऱ्याच्या हाती जाता नये तसेच टक्केवारीत वाया जाऊ देऊ नका. फटीतून पैसे कसे मिळतील याचा विचार करणारे लोक अजूनही मालवण नगरपालिकेत आहेत, तसे काही होऊ नये याची काळजी घ्यावी. नगराध्यक्षानी सर्व कामांचा दर आठवड्याला आढावा घ्यावा, मुख्याधिकाऱ्यांनीही लक्ष लक्ष ठेवावे, प्रसंगी नगराध्यक्षानी आपल्या अधिकाराचा वापर करावा, अशा रोखठोक सूचना देखील यावेळी आम. निलेश राणे यांनी केल्या.

शेअर करा