मालवण, दि. १८ सप्टेंबर
मारहाणीच्या आरोपाखाली दाखल असलेल्या एका गुन्ह्यातून सुकळवाड पाताडेवाडी येथील संशयित आरोपी शांताराम मारुती पाताडे यांची येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. पुराव्यांचा अभाव आणि साक्षीदारांच्या जबाबातील मोठी विसंगती लक्षात घेऊन न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
संशयित आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३२६, ३२४, ३२३, ३५२, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी येथील न्यायालयात नियमित सुनावणी सुरू होती.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, फिर्यादी आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेल्या जबाबांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. या विसंगतीमुळे संशयितावरील आरोप सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरला. बचाव पक्षातर्फे करण्यात आलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरला.
या खटल्यात संशयित आरोपीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. हेमेंद्र लक्ष्मण गोवेकर, अॅड. तारीका प्रकाश चिंदरकर-कुबल आणि अॅड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांनी काम पाहिले व प्रभावी बचाव मांडला.