विरोधकांचा मालवण न. प. सत्ताधाऱ्यांवर आरोप
मालवण,दि.१७ ऑक्टोंबर
मालवण नगरपालिकेच्या मासिक सभेत गत सभेचे इतिवृत्त वाचताना कचरा व्यवस्थापन ठेकेदारास एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा ठराव घेण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. मात्र गत सभेत कचरा ठेकेदारास एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा ठरावच घेण्यात आला नव्हता, कचरा व्यवस्थापन ठेकेदार योग्य रीतीने काम करत नसून त्याला मुदतवाढ दिल्याचा खोटा ठराव सत्ताधाऱ्यांनी घेतला आहे, त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा प्रकार आहे अशी टीका मालवण नगरपालिकेतील ठाकरे शिवसेनेचे गटनेते नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
कचरा व्यवस्थापन ठेक्यास मुदतवाढ दिल्याच्या ठरावावावरून मालवण नगरपालिकेच्या मासिक सभेत विरोधक व सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. या सभेनंतर विरोधी गटातील नगरसेवकांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, अनिता गिरकर, अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर उपस्थित होते.
यावेळी महेंद्र म्हाडगुत म्हणाले, नगरपालिकेच्या सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरु असताना मागील सभेत कचरा व्यवस्थापन ठेकेदाराला एक महिन्याची मुदत वाढ देण्याचा ठराव घेतल्याचे वाचण्यात आले. या ठरावास आक्षेप घेतला. मागील सभा ही १३ ऑगस्ट रोजी झाली होती. त्या सभेमध्ये कचरा ठेकेदारास मुदतवाढ देण्याचा विषयच पटलावर नव्हता तसेच मुदतवाढीचा कोणताही ठराव घेतला नव्हता, चालू ठेका ऑक्टोबर महिन्यात संपत असल्याने केवळ कचरा व्यवस्थापनासाठी नवीन निविदा काढण्याचा ठराव घेण्यात आला होता, असे असताना इतिवृत्तात मुदतवाढीचा ठराव कसा काय नमूद करण्यात आला ? असा आक्षेप आम्ही घेतला. कचरा ठेकेदार हा योग्य पद्धतीने काम करत नव्हता, तरीही त्यास एक महिन्याची मुदतवाढ देण्याचा खोटा ठराव घेण्यात आला, तसेच गेल्या दोन महिन्यात कचरा व्यवस्थापनची नवीन निविदा देखील सत्ताधाऱ्यांनी काढलेली नाही. त्यामुळे इतिवृत्तामधील मुदतवाढीचा ठराव काढून टाकण्यात यावा, अशी लेखी मागणी सभागृहासमोर केली आहे, असेही श्री. म्हाडगुत यांनी सांगत खोटा ठराव घेऊन भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
खोटे ठराव जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न – सुदेश आचरेकर
यावेळी सुदेश आचरेकर म्हणाले, सभेच्या इतिवृत्तात दुरुस्ती करता येते मात्र कोणताही बदल करता येत नाही. असे असताना इतिवृत्तात खोटा ठराव नमूद करणे ही गंभीर बाब आहे. नगरपालिकेतील विद्यमान सत्ताधारी अशा प्रकारचा खोटा ठराव घेऊन त्यामध्ये सर्वच नगरसेवकांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतील तसेच असे खोटे ठराव जनतेच्या माथी मारण्याचे प्रयत्न करत असतील तर ही गंभीर बाब आहे. या ठरावात दुरुस्ती करण्याच्या मागणीस सत्ताधाऱ्यांनी नकार देत ठराव जनतेच्या माथी मारला आहे. त्यामुळे यात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. कचरा ठेकेदारास कितीवेळा मुदतवाढ द्यावी ? एक महिन्यात कचरा व्यवस्थापनची नवीन निविदा काढता आली असती मात्र ती न काढल्याने या विषयात काहीतरी गौडबंगाल आहे असे दिसून येते. याबाबत मी सभेत तटस्थ भूमिका घेतली असली तरी सत्ताधाऱ्यांनी अशी प्रकारे खोटे ठराव घेणे गंभीर बाब असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावा, असेही श्री. आचरेकर म्हणाले.