आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
मालवण,दि.११ ऑक्टोबर
मालवण शहरात शिवसेना संघटनात्मक दृष्ट्या अधिक प्रबळ करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने आज धोरणात्मक पाऊल उचलले असून डॅशिंग कट्टर राणे समर्थक तथा तरुण उद्योजक राजु बिडये यांची शिवसेनेच्या मालवण शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या उपास्थितीत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी श्री. बिडये यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी आम. राणे यांनी श्री. बिडये यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मालवण धुरीवाडा येथील तरुण उद्योजक आणि मालवणच्या सामाजिक क्षेत्रात अग्रणी कार्यकर्ता म्हणून काम करणारे राजु बिडये हे युवा आणि तरुण वर्गात धडाडीचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. राजू बिडये हे गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय आहेत. रक्तदान चळवळ, आरोग्यविषयक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच क्रीडा क्षेत्रातील योगदानामुळे त्यांची, विशेष ओळख आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर शहर संघटनेची जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वी ते शहर संघटक होते
राजू बिडये हे वीज वितरण कंपनीतील सेवानिवृत्त अधिकारी कै. दादा बिडये यांचे चिरंजीव आहेत. सामाजिक क्षेत्रातील अनुभव आणि विविध स्तरांवरील जनसंपर्काच्या बळावर शहरात पक्षाची संघटना अधिक व्यापक करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असेल.
शहरातील विविध प्रभागांमध्ये पक्षाचा संपर्क वाढविणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि युवकांना संघटनेशी जोडणे, या बाबींवर राजू बिडये यांना भर द्यावा लागणार आहे. तसेच नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांची दखल घेऊन ते सोडविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर असेल. राजू बिडये यांच्या नियुक्तीचे पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात येत आहे.
आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहरात शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका राजू बिडये यांनी यावेळी व्यक्त केली.