लाखोंची पारितोषिके आकर्षणाचे केंद्र
मालवण,दि.२५ ऑगस्ट
नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटीवर गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता नारळ लढविण्याच्या दोन भव्य स्पर्धांचा महासंगम रंगणार आहे. सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा तसेच रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत नारळ लढविणे स्पर्धा एकाच दिवशी, एकाच मंचावर होणार आहे.
सतीश आचरेकर मित्रमंडळ आयोजित स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तब्बल १ लाख १ हजार १११ रुपये रोख व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकास ५१ हजार १११ रुपये व चषक, तृतीय क्रमांकास २१ हजार १११ रुपये व चषक, तर चतुर्थ क्रमांकास ११ हजार १११ रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे.
तसेच रॉयल ब्रदर्स मित्रमंडळ आयोजित व सतीश आचरेकर पुरस्कृत स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ११ हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये व चषक, तर तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी २ हजार २०० रुपये व आकर्षक चषक अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
मालवणच्या पारंपरिक नारळ लढविण्याच्या खेळाला नारळी पौर्णिमेच्या उत्साहाची जोड मिळणार असून, एकाच दिवशी दोन स्पर्धा रंगणार आहेत. मालवणी संस्कृती, परंपरा आणि उत्साहाचा अनुभव घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.