विद्यार्थ्यांनी डिजिटल विश्वात वावरताना आवश्यक दक्षता बाळगावी; उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांचे आवाहन
मालवण,दि.१८ ऑक्टोंबर
वाढत्या डिजिटल युगात धोके देखील मोठे आहेत. प्रत्येकाने सायबर गुन्ह्यांपासून सावध राहिले पाहिजे. डिजिटल विश्वात वावरताना प्रत्येक विद्यार्थ्याने आवश्यक ती दक्षता बाळगावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी आणि मालवण पोलीस ठाण्याचे प्रभारी दीपक शेलार यांनी येथे बोलताना केले.
स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पोलीस प्रशासन व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी व तरुणांसाठी ‘सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थांचे दुष्परिणाम’ या विषयावर विशेष मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक शेलार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाढत्या ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडियाचा गैरवापर, ओटीपी शेअरींग, आणि अज्ञात लिंक्सवर क्लिक करण्याचे धोके यावर सविस्तर प्रकाश टाकला. तसेच अंमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर बोलताना दीपक शेलार यांनी व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे तर संपूर्ण कुटुंब आणि भविष्य उद्ध्वस्त होते. तरुणांनी कोणत्याही आमिषाला अथवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांपासून पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. परिसरात कुठेही संशयास्पद हालचाली किंवा अंमली पदार्थांची विक्री आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य के.के.राबते यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानत अशा मार्गदर्शन सत्रांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान आणि सुरक्षिततेची जाणीव निर्माण होण्यास मदत होते, असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अन्वेषा कदम यांनी केले. यावेळी प्राध्यापक, पोलीस कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते.