मालवणातील मोकाट गुरांच्या प्रश्नी ठाकरे शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा…

शेअर करा

मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना निवेदन सादर

मालवण , दि. ०७ जुलै

मालवण शहरात सध्या मोकाट गाई व गुरांमुळे अत्यंत गंभीर समस्या निर्माण झाली असून, यावर तात्काळ प्रतिबंधात्मक व दंडात्मक कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांना लेखी निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. शहरात फिरणाऱ्या या मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास नागरिकांना सोबत घेऊन नगरपरिषद कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठ तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाई-गुरे मोकाट फिरत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक, पादचारी आणि व्यापाऱ्यांना अत्यंत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने ही जनावरे रस्त्यांवर, दुकानांच्या गाळ्यांसमोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर शेण टाकतात, ज्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय, भर रस्त्यात ठाण मांडून बसणाऱ्या गुरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत असून दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.


मालवण हे ऐतिहासिक आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातील अस्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षेचा प्रश्न या मोकाट गुरांमुळे ऐरणीवर आला आहे. शहरात येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने मालवण शहराची प्रतिमा यामुळे मलीन होत असल्याचा संतप्त आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.


ही समस्या अनेक दिवसांपासून कायम असूनही नगरपरिषद प्रशासनाकडून अद्याप कोणतीही प्रभावी किंवा ठोस उपाययोजना करण्यात आलेली दिसत नाही, अशी नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे शहरातील सर्व मोकाट जनावरे पकडून त्यांची योग्य त्या कोंडवाड्यात किंवा सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी. तसेच, जे नागरिक आपली गाई-गुरे अशी मोकाट सोडून रस्त्यांवर सार्वजनिक उपद्रव निर्माण करत आहेत, त्यांच्यावर कडक दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी ठाम मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.


या गंभीर समस्येबाबत शिष्टमंडळाने मुख्याधिकारी प्रतीक थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी म्हणाले की, मोकाट जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकण्याची कार्यवाही नगरपरिषदेमार्फत यापूर्वीही प्रभावीपणे करण्यात आली आहे. मात्र, मोकाट जनावरे पकडण्याची जुनी निविदा संपुष्टात आली असल्याने सध्या ही मोहीम काहीशी थंडावली होती. आता प्रशासनाने नवीन निविदा प्रक्रिया सुरू केली असून, ती अंतिम टप्प्यात आहे. नवीन निविदा मंजूर होताच तातडीने शहरात मोकाट जनावरांना पकडण्याची मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी थोरात यांनी उपस्थित शिष्टमंडळाला दिले.
या निवेदनावर ए. एन. कारेकर, रघुनाथ राणे, प्रसाद धारगळकर, मेघा सावंत, रेश्मा सशिधरन, अशोक परब, निकिता चव्हाण, गणेश कुडाळकर, चिन्मय कुवळेकर, अजय मुणगेकर, समर्थ पाटील, अशोक कडू, मनस्वी शिरगावकर, कमलाकर खोत आदी नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


याप्रसंगी ठाकरे शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण चव्हाण, लक्ष्मण मेस्त्री, स्वप्नील मालवणकर, कमलाकर खोत यांच्यासह स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा