मालवण ,दि.०७ ऑगस्ट
वडाचापाट येथील देवी शांतादुर्गा हायस्कूल येथे आयोजित रानभाजी पाककला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये सिद्धी भरत पालव (लाजरीच्या पानांचे कटलेट) हिने प्रथम क्रमांक पटकाविला. तर चैताली मंगेश पाताडे (उंबराच्या फळांची भाजी) हिने द्वितीय क्रमांक तसेच हितेश संभाजी वायंगणकर, (आघाड्याच्या पानांची भाजी) व नेहा सतीश पालव (शेवग्याच्या पानांचे पराठे) यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धकांनी रानभाज्यांच्या नावीन्यपूर्ण पाककृती सादर केल्या. पाककृतींमध्ये अळूवडी, मिक्स भाजी, शेवग्याच्या पानांचे पराठे, शेवग्याच्या पानांची भजी, टाकळाची वडी, फोडीशीची भजी, घोटीच्या वेलीची भाजी, अळूच्या गाठी, टाकळ्याची भजी, कुईवडी, दुदुर्त्याची भाजी व पेवगा पराठा यांचा समावेश होता. या स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून कनिका मंगेश पाटकर टाकळाचे कटलेट, वैदेही श्रीनिवास हडकर-शेवग्याच्या पानांची भजी तसेच अदिती दिनेश कदम-अळूवडी असे अनुक्रमे क्रमांक काढण्यात आले.
मुख्याध्यापक प्रसाद कुबल, शिक्षिका वेदिका दळवी व प्रतिभा केळुसकर यांनी परीक्षण केले. विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालकही कार्यक्रमास उपस्थित होते.