मालवण : सिंधुदुर्ग महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

शेअर करा

मालवण ,दि.१४ जुलै

मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग आणि व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक लोकसंख्या दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढती लोकसंख्या, तिचे सामाजिक – आर्थिक परिणाम, कुटुंब नियोजन, आरोग्य जागरूकता आणि शाश्वत विकास या विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. व्ही. हरगिले हे होते. प्रारंभी व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी प्रास्ताविक करत विद्यार्थ्यांनी जबाबदार नागरिक म्हणून लोकसंख्या नियंत्रण व जनजागृतीमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

यावेळी प्रमुख वक्त्या डॉ. उज्वला सामंत यांनी “लोकसंख्या वाढ आणि तिचे परिणाम तसेच लोकसंख्या नियंत्रणाची आवश्यकता” या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती, लोकसंख्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या बेरोजगारी, दारिद्र्य, शिक्षण, आरोग्य, निवास, अन्नसुरक्षा आणि पर्यावरणीय समस्यांवर सखोल विवेचन केले. तसेच कुटुंब नियोजन, महिलांचे शिक्षण, स्त्री-पुरुष समानता, आरोग्य सेवा, जनजागृती आणि सुशिक्षित समाजाची निर्मिती या माध्यमातून लोकसंख्या स्थिरतेचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असे डॉ. सामंत यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले.

या कार्यक्रमास संग्राम पवार, श्री. बेळेकर तसेच विज्ञान शाखेतील प्राध्यापक, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी मिसबा काझी हिने केले. आभार गौतम मानवर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती सामंत, तन्वी साळकर, मयुरेश, मितेश आणि विनीत यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा