Masore : ऑनलाइन कामांच्या वाढत्या ताणाविरोधात प्राथमिक शिक्षकांचे २१ ऑक्टोबरला धरणे आंदोलन

शेअर करा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (सिंधुदुर्ग) आक्रमक; ओरोस येथे दुपारी २ ते ५ या वेळेत आंदोलन, प्रत्यक्ष अध्यापनावर परिणाम होत असल्याचा संघटनेचा दावा

मसुरे ,दि.१३ ऑक्टोंबर (झुंजार पेडणेकर)
प्राथमिक शिक्षकांवर सातत्याने लादल्या जाणाऱ्या ऑनलाईन लिंक, शालेय वेळेतील प्रशिक्षणे आणि विविध उपक्रमांचे फोटो व अहवाल अपलोड करण्याच्या कामांविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती (शाखा सिंधुदुर्ग) आक्रमक झाली आहे. याविरोधात बुधवार, २१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत जिल्हा प्रशिक्षण संस्था, ओरोस येथे लक्षवेधी धरणे आंदोलन केले जाणार आहे.
​”शिक्षकांनी शिकवायचे की ऑनलाईन लिंक आणि अहवाल अपलोड करायचे? यामुळे प्रत्यक्ष अध्यापनावर विपरीत परिणाम होऊन शिक्षकांवर ताण येत आहे,” असा सवाल संघटनेने केला आहे.

​अनावश्यक ऑनलाईन कामे बंद करा: ऑनलाईन लिंक, फोटो व अहवाल अपलोड करण्याचे काम थांबवावे.
​शैक्षणिक वेळेचे रक्षण: शालेय वेळेतील प्रशिक्षणांचे प्रमाण कमी करून शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ द्यावा.
​सुलभक नियुक्तीस विरोध: शिक्षकांना वारंवार प्रशिक्षणासाठी सुलभक (Facilitator) म्हणून नियुक्त करू नये; त्याऐवजी विषयतज्ज्ञ व उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करावा.
​उपक्रमांची उपयुक्तता तपासावी: विविध उपक्रमांचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीला केंद्रस्थानी ठेवून नियोजन करावे.
​मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सरचिटणीस गिल्बर्ट फर्नांडिस यांनी दिला आहे.

शेअर करा