मसुरे: डांगमोडे सुपुत्र दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक व अति-उत्कृष्ट सेवा पदक जाहीर!

शेअर करा

३५ वर्षांच्या निष्कलंक सेवेबद्दल दुहेरी सन्मान ; मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या हस्ते सत्कार

मसुरे,दि. १९ ऑगस्ट(झुंजार पेडणेकर)

मालवण तालुक्यातील डांगमोडे गावचे सुपुत्र, आणि बृहन्मुंबई येथे गुन्हे शाखेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले श्री दिपक अनंत ठाकूर यांना पोलीस दलातील सेवेबद्दल राष्ट्रपती पदक (गुणवत्ता पूर्ण सेवा ) जाहीर झाले आहे. तसेच 25 वर्ष अविरत सेवे बद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अती उत्कृष्ठ सेवा पदक’ सुद्धा त्यांना जाहीर झाले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस, कारागृह, अग्निशामक आणि होमगार्ड दलातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना घोषित झालेल्या राष्ट्रपती पदक व सेवा पदकांची घोषणा 14 ऑगस्टला झाली होती. एलएलबी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेले ठाकूर हे १९९१ मधे मुंबई पोलीस दलात दाखल झाले. ३५ वर्षांच्या सेवाकाळात त्यांच्या निष्कलंक, शिस्तबद्ध, उत्कृष्ट सेवा कामगिरीची दखल घेऊन यापूर्वी विविध पुरस्कार जाहीर झाले आहेत. यापूर्वी त्यांनी जुहू, ओशिवरा, कांदिवली पोलीस स्टेशनला काम केले आहे. 2010 साली त्याना पोलीस महासंचालक पदक देऊन सन्मानित करण्यात आले होते. १५ ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस मुख्यालयात मुंबई पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती यांनी त्यांचा कुटुंबासमवेत सत्कार करत अभिनंदन केले. डांगमोडे येथील राजेंद्र ठाकूर, नारायण ठाकूर यांचे ते भाऊ असून दीपक ठाकूर यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्या बद्दल अभिनंदन होत आहे.

शेअर करा