▪️भाताची व नाचणीची रोपवाटिका वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मसुरे, दि. २० जून (झुंजार पेडणेकर)
भात व नाचणीची रोपवाटिका उगवून आली आहे. परंतु पाऊस नसल्यामुळे ही कोवळी रोपे व मोड आलेले बियाणे उन्हामुळे वाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, कणकवली (जिल्हा सिंधुदुर्ग) यांच्या वतीने तळवळे (ता. कणकवली) येथे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उप विभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील यानी सांगितले की, पाऊस नसल्याच्या स्थितीत सर्वच शेतकऱ्यांना मोटरपंपाद्वारे रोपवाटिकांना पाणी देणे शक्य नसते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवू नये म्हणून त्यांनी आपल्या रोपवाटिकांना औषध फवारणीच्या पंपाद्वारे एअर इरिगेशन’ (कृत्रिम तुषार पद्धती)करावे.
कृषी विभागामार्फत या तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके दाखवत अत्यंत सोपी पद्धत समजावून सांगण्यात आली.
औषध फवारणीच्या पंपामध्ये केवळ स्वच्छ पाणी भरून घ्यावे. सूर्यास्तानंतर सायंकाळी पंपाचा नोझल उलटा धरून रोपवाटिका क्षेत्रावर पाण्याची फवारणी करावी. असे केल्यामुळे रोपवाटिका क्षेत्रावरील हवेतील आर्द्रता वाढते व रोपांची पाने हवेतील आर्द्रता शोषून घेऊन वाढतात व सुकून जात नाहीत.
या पद्धतीचा वापर केल्याने हवेतील आर्द्रता वाढते, रोपांची वाढ चांगली होते आणि मुख्य म्हणजे तीव्र उन्हातही रोपे सुकून जात नाहीत.
“आपली रोपवाटिका वाचवा, चांगले उत्पादन घ्या!” असा संदेश देत, ज्या शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकल्या आहेत त्यांनी या ‘एअर इरिगेशन’ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाकडून तळवळे येथील जनजागृती कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला
उपविभागीय कृषी अधिकारी कणकवली उमाकांत पाटील, उप कृषी अधिकारी मृदुला प्रभु, सहाय्य्क कृषी अधिकारी दिलीप चव्हाण, सत्यवान तीवरेकर, मंगेश चाळके, नारायण कासले, विठोबा चव्हाण, सुनिधी चव्हाण, मनस्वी सुतार, अक्षय पालव तसेच कसवण- तळवळे, परिसरातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.