जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त कुडाळ व कणकवली येथे आयोजन
मसुरे,दि.२३ जुलै (झुंजार पेडणेकर)
जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त श्री चेस अकॅडमी, कणकवली आणि नवजीवन चेस अकॅडमी, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली व कुडाळ येथे विशेष बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या उपक्रमात 100 हून अधिक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जागतिक बुद्धिबळ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्पर्धेच्या उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभास साटेलकर सर, सीआयडी विभागाचे अधिकारी देसाई सर, राजेंद्र तवटे सर, म्हापसेकर सर, घाडी सर, सुयोग धामापूरकर, श्रीकृष्ण आडेलकर, बळीराम आडेलकर , डॉ. रावण तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बुद्धिबळाचे महत्त्व, एकाग्रता, संयम, नियोजन आणि अभ्यासातील उपयोग याविषयी मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना नियमित सराव करण्याचे आवाहन केले.
स्पर्धेचे यशस्वी व शिस्तबद्ध आयोजन करण्यासाठी फिडे रेटेड खेळाडू तनिष्का आडेलकर, चेतन भोगटे, कार्तिकेय चव्हाण आणि मीनल सुलेभावी यांनी पंच म्हणून उत्कृष्ट जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेनंतर सर्व सहभागी खेळाडूंना पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजेत्यांसह प्रत्येक स्पर्धकाच्या सहभागाचे कौतुक करण्यात आले. आयोजकांनी भविष्यातही अशा दर्जेदार बुद्धिबळ स्पर्धा व प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.
निकाल पुढील प्रमाणे. ▪️कुडाळ केंद्रावर ६ वी ते १२ गटात वसंत गवस (सावंतवाडी), अनुज व्हनमाने (कुडाळ), विराज सामंत (कुडाळ), दीपल आचरेकर (कुडाळ) , सन्मिल साटेलकर (वेंगुर्ला) आणि १ ली ते ५ वी गटात दीपांशु दळवी (सावंतवाडी), समर्थ गावडे (मालवण), गार्या साटेलकर (सावंतवाडी) , हर्ष माइनकर (कुडाळ), मेधा देसाई (सावंतवाडी) या प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले. ▪️कणकवली केंद्रावर १ ली ते ५ वी गटात स्वयम वालावलकर (कणकवली), स्वानंद आमडोसकर (कणकवली), अभिराज हुले (कणकवली), मंथन खेत्री (कणकवली), सोहम लाड (ओरोस) आणि ६ वी ते १२ वी गटात साइराज मोटे (कणकवली), लौकिक मुंडले (कणकवली), नील अवसरे (कणकवली), कार्तिकेय चव्हाण (कणकवली), काव्या पारकर (कणकवली) या मुलांनी प्रथम पाच क्रमांक प्राप्त केले आहेत.जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ चळवळीला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थित पालक, खेळाडू आणि मान्यवरांनी व्यक्त केली.