मसुरे,दि.२३ जून (झुंजार पेडणेकर)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, सिंधुदुर्ग शाखेच्या वतीने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या मागणीसाठी २९ जून २०२६ रोजी दुपारी २.३० ते सायं. ५.०० या वेळेत जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
संघटनेच्या वतीने यापूर्वी अनेक वेळा निवेदने, धरणे आंदोलने तसेच चर्चांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. तथापि, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने संघटनेत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत. २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, डीसीपीएस खात्यातील रक्कम व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम भविष्य निर्वाह निधीत वर्ग करणे, निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव तातडीने मंजूर करणे, शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा यासाठी प्रशासकीय कामासाठी आठवड्यातील एक दिवस निश्चित करणे, वस्ती शाळा शिक्षक नियुक्ती शासन निर्णयाच्या दिवसापासून लागू करणे, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करणे, शिक्षक प्रशिक्षणाचे शैक्षणिक सत्रानुसार नियोजन करणे, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा बीट स्तरावर घेणे, २००२-०३ मधील शिक्षकांच्या वेतन त्रुटी दूर करणे, शिक्षण सेवकांना नियमित वेतन श्रेणी लागू करणे, चुकीने कपात झालेली डीसीपीएस रक्कम परत देणे, शालेय वेळ पूर्ववत करणे, प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत अनुदान व साहित्य वेळेत उपलब्ध करून देणे, मेनू कार्डमध्ये स्थानिक गरजेनुसार बदल करणे, स्थायी आदेश प्रस्ताव मंजूर करणे, अनुदान वेळेवर मिळूनही पगार विलंब टाळणे, शिष्यवृत्ती योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे, गणित-विज्ञान पदवीधर शिक्षकांना S-14 वेतनश्रेणी देणे, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे, अतिरिक्त उच्च श्रेणी मुख्याध्यापकांचे पगार वेळेत करणे, दिव्यांग कर्मचाऱ्यांची स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी तयार करणे, सहाय्यक तंत्रज्ञान उपकरणे मंजूर करणे, BLO कामातून प्राथमिक शिक्षकांना वगळणे, प्रलंबित मेडिकल बिले मंजूर करणे, पवित्र पोर्टलद्वारे भरती झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जाहीर करणे, ऑनलाइन कामासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे तसेच शाळास्तरावर सर्व पत्रव्यवहार हार्ड कॉपी स्वरूपात उपलब्ध करून देणे.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली निघणे अत्यावश्यक असून त्याचा थेट संबंध शिक्षणाच्या गुणवत्तेशी आहे. प्रशासनाने याबाबत सकारात्मक आणि तातडीची भूमिका घ्यावी; अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन यशस्वी करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती, सिंधुदुर्ग शाखेचे जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे व सरचिटणीस गिल्बर्ट फर्नांडिस यांनी केले आहे.