मसुरे,दि.०७ ऑगस्ट (झुंजार पेडणेकर)
जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग येथील पोषण पुनर्वसन केंद्र (NRC) द्वारे ० ते ५ वयोगटातील अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १० ऑगस्ट रोजी सकाळी १०:०० वाजता जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग (एनआरसी) येथे पार पडणार आहे.
या शिबिरादरम्यान बालरोग तज्ज्ञांमार्फत बालकांची सखोल वैद्यकीय तपासणी केली जाईल. तपासणीत आढळलेल्या गंभीर कुपोषित बालकांना पुढील १४ दिवसांच्या उपचारासाठी पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल केले जाईल. दाखल बालकांसोबत राहणाऱ्या मातांना योग्य आहार, तसेच बालकांच्या आहाराविषयी विशेष प्रशिक्षण व समुपदेशन दिले जाणार आहे.
याशिवाय, रुग्णालयात दाखल असणाऱ्या बालकांच्या पालकांना बुडीत मजुरी म्हणून प्रतिदिन ३०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम बालक डिस्चार्ज होऊन घरी गेल्यानंतर थेट पालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. यासाठी पालकांनी सोबत आपल्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत (झेरॉक्स) आणणे अनिवार्य आहे.
हे शिबिर वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले , सावंतवाडी आणि दोडामार्ग या सर्व तालुक्यांमधील बालकांसाठी आहे.
एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व SAM बालकांना या शिबिरास उपस्थित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे करण्यात आले आहे.