आंबेकरजींच्या जयंतीदिनी पोस्ट तिकिटाचे अनावरण करून उपसभापती सचिन अहिर यांनी इतिहास रचला
मुंबई,दि.२१ ऑगस्ट
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज महात्मा गांधी
सभागृहात संघटनेचे आद्य संस्थापक कामगार महर्षी स्वर्गीय गं.द. आंबेकर यांची १२० वी जयंती संपन्न झाली.उपसभापती सचिन अहिर यांच्याहस्ते कामगार महर्षी गं.द.आंबेकर यांच्या नावे पोस्टाच्या तिकिटाचे अनावरण करून आज इतिहास रचला गेला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र सर्कल,चिफ पोस्ट मास्टर जनरल, रामचंद्र किसन जायभाय आणि अन्य अधिकारीवर्ग उपस्थित होता. आंबेकर श्रमसंशोधन संस्थेचे संचालक जी.बी. गावडे,आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
प्रारंभी गं.द.आंबेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
गिरणी कामगार घरांचा आणि बंद गिरण्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल,असे सांगून सचिन अहिर कामगार आणि कार्यकर्त्यांपुढे बोलताना आपल्या भाषणात म्हणाले, ज्याकाळात कामगार संघटना बांधणे कठीण होते,अशा १९३८ मध्ये गिरणी कामगारांची संघटना बांधून त्यांना न्याय हक्क मिळवून दिला आणि त्यांचे जीवनमान उंचाविले. उद्योग टिकला तर कामगार जगेल,हे आजचे वास्तव आंबेकरजींनी त्याकाळात अनुसरले म्हणूनच आंबेकरजींना दूरगामी विचाराचा नेता म्हटले जाते!
सुरूवातीला सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात सांगितले,गं.द.आंबेकरजींनी आपली संपूर्ण हयात कामगार कल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजवली.त्यांनी आपल्या भाषणात गं.द.आंबेकरजींचा समग्र जीवनपट कामगारांच्या समोर ठेवला.
याप्रसंगी गिरणी कामगारांच्या इयत्ता १० वी १२ वी उत्तीर्ण मुलांना तसेच नातवंडांना सुमारे २ लाख रूपयांवर आंबेकर शैक्षणिक सहाय्याचे वाटप करण्यात आले.
याच ठिकाणी आंबेकरजींच्या स्वप्नातील “राष्ट्रीय मजदूर मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाची,५१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते होते. संस्थेचे महाव्यवस्थापक विलास डांगे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचला.सर्वश्री निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेंकर,खजिनदार बजरंग चव्हाण,सुनील बोरकर,मारुती शिंत्रे, शिवाजी काळे, बळीराम महाडिक, मनोहर पाटील,सौ. स्मिता शिंदे, सौ.सुनिता खराटे या संचालकांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला.संस्थेच्या वतीने सदस्य कामगारांच्या इयत्ता दहावी बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहाय्य देऊन गुणगौरव करण्यात आला.
राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या १२० व्या जयंती निमित्ताने संघटनेचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या कामगार चळवळीतील निष्ठामयी कामाबद्दल त्यांचा तसेच प्रसिद्धीप्रमुख काशिनाथ माटल यांच्या साहित्य लेखणीतील अद्वितीय कामगिरीबद्दल उपसभापती सचिन अहिर आणि गोविंदराव मोहिते तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे राजन लाड,सुनील अहिर,मिलिंद तांबडे,किशोर रहाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते