Nitesh Rane : सिंधुदुर्गात ५ हजार वनराई बंधारे पूर्ण

शेअर करा


१० हजारांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी मोहीम सुरु ठेवा ; लोकसभागातून झालेल्या वनराई बंधा-यांबद्दल केले कौतुक

सिंधुदुर्ग,दि.१० ऑक्टोबर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर झाल्यानंतर भविष्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवू नये, यासाठी जिल्हाभरात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेला नागरिक, ग्रामपंचायती, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत जिल्ह्यात ५ हजार वनराई बंधारे पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यासाठी निश्चित केलेल्या १० हजार बंधाऱ्यांच्या उद्दिष्टापैकी ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.तसेच या उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व सिंधुदुर्गवासीयांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात आले. त्यानंतर गावागावांत नागरिकांनी एकत्र येऊन ग्रामपंचायतींना विश्वासात घेत वनराई बंधारे बांधण्याची मोहीम राबवावी, असे आवाहन पालकमंत्री म्हणून आम्ही केले होते.या आवाहनाला जिल्ह्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत वनराई बंधारे उभारण्याचे काम हाती घेतले. कोणतेही राजकारण किंवा मतभेद बाजूला ठेवून संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा एक कुटुंब म्हणून या मोहिमेत सहभागी झाला, ही अभिमानाची बाब असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आज विहिरींमध्ये उपलब्ध असलेले पाणी आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांना अधिक गती देणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रत्येक गावाने वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवावी. निर्धारित १० हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. आपल्या पुढील पिढीला दुष्काळाचा चटका सहन करावा लागू नये, तसेच भविष्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने जलसंधारणाच्या कामात योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

शेअर करा