नटराज पूजनाने वर्गांना सुरुवात; सिंधुदुर्गातील १२ वर्षांच्या यशस्वी परंपरेनंतर गोव्यात पदार्पण
सावंतवाडी ,दि.१४ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या १२ वर्षांपासून कथ्थक नृत्याची परंपरा जोपासत असलेल्या ‘नृत्यांगण कथ्थक क्लासेस’ने आता गोवा राज्यातही विस्तार केला आहे. गोव्यातील पेडणे येथे नव्या शाखेचा शुभारंभ नुकताच नटराज पूजनाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
या वर्गांच्या संचालिका तथा नृत्य विशारद सौ. काश्मिरा रुजूल पाटणकर या विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे शास्त्रशुद्ध आणि दर्जेदार प्रशिक्षण देणार आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी कथ्थक क्षेत्रात यश मिळविले असून आता गोव्यातील विद्यार्थ्यांनाही ही संधी उपलब्ध होणार आहे.
‘नृत्यांगण कथ्थक क्लासेस’च्या ओरोस, कुडाळ, माणगाव, बांदा आणि सावंतवाडी येथील शाखा यशस्वीपणे कार्यरत आहेत. तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाही कथ्थकचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या १२ वर्षांपासून संस्थेचा परीक्षांमधील निकाल शंभर टक्के लागला असून ही परंपरा कायम राखण्यात संस्थेला यश आले आहे.
या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना कथ्थक नृत्याचे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाणार असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या मान्यताप्राप्त प्रारंभिक ते विशारद पूर्ण या सर्व परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शनही केले जाणार आहे.
पेडणे येथील कथ्थक वर्ग दर गुरुवारी सायंकाळी आयोजित करण्यात येणार असून प्रवेश व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी सौ. काश्मिरा रुजूल पाटणकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.