देवगड,दि. ११ जून
देवगड तालुक्यातील कुणकेश्वर समुद्रकिनारी सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपशामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास कुणकेश्वर वरचीवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत समुद्रकिनारी सुरू असलेल्या वाळू उपशाच्या प्रकाराला विरोध केला. यावेळी संबंधितांना जाब विचारत काही संशयितांना ग्रामस्थांनी ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. ग्रामस्थांच्या या भूमिकेमुळे वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून काहींनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सरपंच व तलाठी यांनीही घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत शांत बसणार नसल्याचा इशारा वरचीवाडी ग्रामस्थांनी दिला.
यावेळी ग्रामस्थांनी महसूल प्रशासनालाही थेट सवाल उपस्थित केला. श्री क्षेत्र कुणकेश्वरसारख्या पर्यटन स्थळी जर अशा प्रकारे कथित अवैध वाळू उपसा सुरू असेल, तर महसूल प्रशासन नेमके काय करत आहे? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित करत या प्रकारांवर तातडीने आळा घालण्याची मागणी केली.यावेळी देवस्थान ट्रस्टचे सचिव हेमंत वातकर, अभय पेडणेकर, वरचीवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष सुहास नानेरकर, निखिल कुणकेश्वरकर, सुहास वातकर, दीपक घाडी, ओंकार घाडी, केतन साटम, अनिकेत साईम, किरण गोईम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.