सायंकाळी शास्त्रोक्त पद्धतीने देवगड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार; “आमचा अण्णा गेला” म्हणत नातेवाईकांचा हंबरडा, मित्रपरिवाराच्या डोळ्यांत अश्रू
देवगड,दि.१३ जुलै
देवगड तालुक्याच्या पत्रकारिता क्षेत्रातील दिलदार, मनमिळावू आणि सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांच्यावर सोमवारी (दि. १३) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास देवगड येथील स्मशानभूमीत शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पत्रकार, राजकीय, सामाजिक, व्यापारी, विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व स्तरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
अंत्ययात्रेदरम्यान वातावरण अत्यंत भावूक झाले होते. “आमचा दया गेला… आता असा दिलदार मित्र पुन्हा होणार नाही…”, “आमचा अण्णा गेला…” अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या शब्दांत मित्रपरिवार आणि नातेवाईकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मांगले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत असताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले, तर कुटुंबीयांनी हंबरडा फोडल्याने उपस्थित प्रत्येकाचे मन हेलावून गेले.
दयानंद मांगले यांनी अनेक वर्षे पत्रकारितेत प्रामाणिकपणे कार्य करत सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लेखणी चालवली. पत्रकार म्हणून त्यांनी निर्भीड भूमिका घेत समाजात विश्वासार्ह ओळख निर्माण केली. त्यांच्या साधेपणा, दिलदार स्वभाव आणि माणुसकीमुळे त्यांनी असंख्य मित्र जोडले होते. त्यामुळे त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण देवगड तालुक्यावर शोककळा पसरली होती.
अंत्यसंस्कारावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
दयानंद मांगले यांच्या निधनाने देवगडच्या पत्रकारिता क्षेत्रातील एक संवेदनशील, अभ्यासू आणि दिलदार व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले असून, त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी सहज भरून न निघणारी असल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली. त्यांच्या कार्याची आणि माणुसकीची आठवण देवगडकरांच्या मनात कायम राहील.
यांच्यासह पत्रकार, सामाजिक, राजकीय, व्यापारी क्षेत्रातील मान्यवर आणि दयानंद मांगले यांचा मोठा मित्रपरिवार उपस्थित होता. सर्वांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.