पनवेल येथे गाबित समाजाचे 18 , 19 जुलैला चिंतन शिबिर

शेअर करा

गाबित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी होणार मार्गदर्शन ; अखिल भारतीय गाबित समाज महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली,दि.०७ जुन

अखिल भारतीय गाबित समाज महासंघ व गाबित समाज मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने “चिंतन शिबिर २०२६ चे आयोजन १८ व १९ जुलै २०२६ रोजी पनवेल येथील एम. जे. रिसॉर्ट, उसर्ली येथे करण्यात आले आहे. समाजाच्या भविष्याचा वेध घेऊन विकासाच्या नव्या दिशा ठरविण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असल्याची माहिती अखिल भारतीय गाबित समाज महासंघ अध्यक्ष परशुराम उपरकर यांनी दिली.

शिबिरामध्ये समाज संघटन, प्रशासनातील कार्यपद्धती, पर्यटन, मत्स्यव्यवसाय, सहकार क्षेत्रातील संधी तसेच विविध शासकीय योजनांची माहिती यांसारख्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. उद्घाटन सत्रात अखिल भारतीय गाबित समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम होणार आहे. गाबित समाज मुंबई महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष सुजय धुरत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पहिल्या दिवशी संघटन व प्रशासकीय कामकाज, समाज कार्यकर्त्यांची भूमिका, मुक्त संवाद तसेच गाबित समाज इतिहास या विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी पर्यटन व समाज, मत्स्यव्यवसायातील संधी, केंद्र व राज्य शासनाच्या योजना, सहकार क्षेत्रातील विकास याबाबत मार्गदर्शन सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. शिबिरासाठी नोंदणी शुल्क प्रति व्यक्ती १ हजार ठेवण्यात आले असून, नोंदणीची अंतिम तारीख १५ जून २०२६ आहे. समाजाच्या विविध स्तरांतील पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाजाच्या विकासासाठी विचारमंथनात सहभागी व्हावे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.

शेअर करा