फोंडाघाट महाविद्यालयाचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

शेअर करा

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यभावना महत्त्वाची – विजय सावंत

फोंडाघाट, दि. १२ सप्टेंबर
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी संचालित कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाटचा ३१ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी मंडळ विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी सुरवसे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या ३१ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी देण्यात महाविद्यालयाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयाने शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, संस्कार व सामाजिक जाणीव रुजविण्याचे कार्य केले आहे असे डॉ. सुरवसे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी महाविद्यालयाने गेल्या ३१ वर्षांत विविध क्षेत्रांत साध्य केलेल्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. महाविद्यालय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देत नसून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सहशैक्षणिक उपक्रमही राबवत असल्याचे त्यांनी सांगितले. उपलब्ध असलेल्या विविध संधींचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. भविष्यात महाविद्यालयात विविध नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असून विद्यार्थ्यांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

संस्थेचे माजी चेअरमन मा. श्री. दिलीप पारकर यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेच्या काळातील विविध अडचणी आणि त्या अडचणींवर मात करण्यासाठी संस्थाचालकांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जीवनात प्रत्येकाने सातत्याने चांगले काम करीत राहिले पाहिजे. केलेल्या चांगल्या कामाचा भविष्यात निश्चितच फायदा होतो, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणा जपावा, कोणाशीही खोटे बोलू नये आणि चांगले संस्कार अंगीकारावेत, असे आवाहन त्यांनी केले.

संस्थेचे माजी चेअरमन मा. श्री. प्रदीप सावंत ऊर्फ अबू पटेल यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात नियमित उपस्थित राहून मन लावून अभ्यास करावा, असे सांगितले. अभ्यासक्रमाचा नियमित अभ्यास केल्यास विविध स्पर्धा परीक्षांची तयारीही त्यातून सहजपणे करता येते, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाच्या जीवनात अडचणी येतात; मात्र त्या अडचणींना घाबरून न जाता त्यांच्यावर मात करून प्रगती साधणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

संस्थेचे सेक्रेटरी मा. श्री. चंद्रशेखर लिंग्रस यांनी फोंडाघाटमध्ये वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरातच उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा महाविद्यालयाच्या स्थापनेमागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. ३१ वर्षांपूर्वीची फोंडाघाटची शैक्षणिक व सामाजिक परिस्थिती आणि आज झालेला सकारात्मक बदल यांचा तुलनात्मक आढावा घेत त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीचे महत्त्व अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. श्री. विजय सावंत, निवृत्त उपआयुक्त, सीमा शुल्क विभाग, मुंबई यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेत आलेले अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. शासकीय सेवेत काम करताना कायदा, नियम, शिस्त, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा यांना असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, “जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ मोठी स्वप्ने पाहणे पुरेसे नाही; त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, योग्य दिशा, प्रामाणिकपणा आणि शिस्त आवश्यक असते. आजचा विद्यार्थी उद्याचा जबाबदार नागरिक आणि देशाच्या विकासातील महत्त्वाचा घटक आहे.”

आपल्या सेवाकाळातील अनुभवांच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांना निर्णयक्षमता, कायद्याचा आदर, जबाबदारीची जाणीव आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या काळात विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, संवादकौशल्य आणि विविध क्षेत्रांतील संधींचा अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे चेअरमन मा. श्री. महेश सावंत यांनी फोंडाघाट महाविद्यालयाच्या प्रगतीचे कौतुक केले. फोंडाघाट महाविद्यालय ग्रामीण व डोंगराळ भागात असले तरी येथील प्राध्यापक अत्यंत तज्ज्ञ, अनुभवी व कुशल आहेत. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थीही मेहनती व जिद्दी आहेत. त्यामुळे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या विविध क्षेत्रांत सातत्याने प्रगती करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

“ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता कोणत्याही बाबतीत कमी नाही. त्यांना योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि संधी मिळाल्यास ते कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश कामत यांनी केले, तर आभार डॉ. राजाराम पाटील यांनी मानले. यावेळी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा