फोंडाघाट, दि. ११ सप्टेंबर
कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील हिंदी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि हिंदी भाषेच्या साहित्यिक जाणिवेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘हिंदी मेरी शान’ या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदी भाषेचा समृद्ध साहित्यिक वारसा, हिंदी साहित्याचे विविध पैलू आणि जागतिक स्तरावर हिंदी भाषेचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या भित्तिपत्रिकेची निर्मिती करण्यात आली आहे. भित्तिपत्रिकेमध्ये हिंदी साहित्याची वैश्विकता, हिंदी साहित्यकारांचे योगदान, हिंदी भाषेचे महत्त्व तसेच साहित्याच्या विविध प्रवाहांशी संबंधित माहितीपूर्ण लेखन समाविष्ट करण्यात आले आहे.
यावेळी हिंदी विभागप्रमुख डॉ. संतोष रायबोले यांनी भित्तिपत्रिकेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आस्था निर्माण करण्याबरोबरच त्यांना हिंदी साहित्याची समृद्ध परंपरा आणि विविध साहित्यिक विचार समजावेत, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना कलात्मक आणि सर्जनशील स्वरूपात व्यक्त करण्याची संधी मिळते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे होते. त्यांनी भित्तिपत्रिकेतील लेखनाचे कौतुक करून विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील विविध साहित्यकृती, साहित्यिकांचे विचार आणि योगदान यांचा अभ्यास करून त्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून संस्कृती, विचार आणि ज्ञानाची वाहक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते