निखिल कन्स्ट्रक्शन च्या कर्मचाऱ्यांची तत्परता
फोंडाघाट,दि.२९ जून(संजय सावंत)
रविवार दुपार पासून सुरू फोंडाघाट परिसरात होत असलेल्या जोरदार संततधार पावसामुळे नेहमीच वाहतुकुसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फोंडाघाटात घाटाच्या मध्यवर्ती भागात, बसस्थानका पासून सुमारे ८ किमी अंतरावर काल रात्री ८. ३० वा. च्या दरम्यान अचानक दरड कोसळल्याने दरडीचे दगड, मलबा,माती रस्त्यावर पसरून फोंडाघाट हून कोल्हापूर च्या दिशेने जाणारी येणारी वाहतूक पूर्णतःहा बंद झाली.सुदैवाने त्यादरम्याने कोणतीही वाहने त्यावेळी येजा करत नसल्याने कोणतेही नुकसान झाले नाही.
दरम्यान याचवेळी आलेल्या एस.टी. बस मधील प्रवाशांनी मोबाईल द्वारे फोंडाघाट मधील नागरिकांशी संपर्क साधून माहिती दिल्यानंतर याच रस्त्यावरील देवगड ते दाजीपूर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीचे व्यवस्थापक प्रसाद शेळके यांना घटनेची माहिती मिळताच तातडीने दोन जेसीबी व आपल्या कामगारांची फौज घेऊन घटनास्थळी दाखल झाले व तातडीने दरडीचा मलबा बाजूला करण्याचे काम तत्परतेने हाती घेतले.
घटनास्थळावरील मोठे झाड कापून माती, दगड व मोठाल्या दरडी बाजूस करण्याचे काम शीघ्र गतीने सुरू केले मात्र संततधार पडणाऱ्या पावसामुळे कामामध्ये व्यत्यय निर्माण होत होता तरीसुद्धा पाऊसाची परवा न करता सर्व कामगार जोमाने रस्त्यावरील दगड माती हटवण्याचे काम करत होते.
फोंडाघाट चेक पोस्ट वरील पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच त्यांनी आपल्या संबंधित विभागाला माहिती दिली.यामुळे वाहतूक पोलिसांनी तातडीने दरड कोसळल्या ठिकाणी धाव घेऊन मदत कार्य शिताफिने पार पाडण्यास सहकार्य केले. फोंडाघाट, दाजीपूर येथील ग्रामस्थांनी सुद्धा आपल्या परीने मदत व सहकार्य केले.
अखेर संततधार पडणाऱ्या पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सर्वांनी, विशेषतः निखिल कन्स्ट्रक्शनचे प्रशाद शेळके आणि कामगार,वाहतूक पोलीस तसेच ग्रामस्थ यांच्या अथक परिश्रमानंतर सुमारे अडीच ते तीन तासांनी, रात्री अकरा वाजता च्या सुमारास दोन्ही बाजूची वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळविले व अडकलेल्या प्रवासी, वाहन चालक यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
