फोंडाघाट येथे डोक्यावर लोखंडी रॉडने वार करत खून

शेअर करा

मद्याच्या नशेतून बाचाबाचीतून कृत्य : संशयित आरोपी ताब्यात

फोंडाघाट ,दि.२८ सप्टेंबर

फोंडाघाट- फोंडेकरवाडी येथील सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर वय ५२ वर्षे यांच्या डोक्यावर दारूच्या नशेत लोखंडी रॉडने जोरदार प्रहार करत त्यांचा खून केल्या घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी संशयित आरोपी विष्णू यशवंत तळेकर गडगेसखल तळेकरवाडी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.

 उपलब्ध माहितीनुसार, सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर व विष्णू यशवंत तळेकर हे दोघेजण दारू पिण्यासाठी अधून मधून फोंडाघाट मधील दारू अड्डयावर भेटत असत              दरम्यान रविवारी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भिकाजी विजय फोंडेकर फोंडेकर हे त्यांचे काका सूर्यकांत विठ्ठल फोंडेकर यांच्या घरी दुसऱ्या दिवशी कामासाठी कोल्हापूर ला जावयाचे असल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी सूर्यकांत फोंडेकर हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले. तसेच बाजूला झोपलेल्या अवस्थेत गडगेसखल - तळेकरवाडी येथील विष्णू यशवंत तळेकर हे दिसून आले.यावेळी भिकाजी यांनी "सूर्यकांत यांना काय झाले?", असे विष्णू तळेकर याला विचारले.

त्यावेळी विष्णू तळेकर याने “सूर्यकांत याने आपणाला शिवीगाळ केली म्हणून आपण त्याला मारले”, असे सांगितले.
यावेळी सूर्यकांत फोंडेकर यांना हलवून विचारले असता त्यांनीही विष्णू तळेकर यांनी मारल्याचे सांगितले.
त्यानंतर भिकाजी फोंडेकर यांनी तातडीने आरडा ओरड करत तेथील लोकांना गोळा करून सूर्यकांत फोंडेकर यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र तेथून पुढे नेण्यास सांगण्यात आल्याने रुग्णवाहिकेतून पुढे कणकवली येथे नेऊन उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भिकाजी फोंडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णू यशवंत तळेकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (1), 352 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(1) (r),(s) व 3 (2), (v) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच पोलिसांनी विष्णू तळेकर याला ताब्यात घेतले असल्याचे समजते. पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

शेअर करा