नोकरी-व्यवसायासाठी दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार; सुरक्षित, जलद आणि किफायतशीर रेल्वे प्रवासासाठी निवेदनाद्वारे मागणी
फोंडाघाट,दि.१४ ऑक्टोंबर (संजय सावंत)
कणकवली ते गोवा नोकरी व्यवसायनिमित्त दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकलसदृश्य विजेवर चालणारी मेमू ट्रेन ची मागणी लोरे घोणसरी प. स. सदस्य मानसी मराठे यांनी एका निवेदनाद्वारे खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे.
या निवेदनामध्ये,कणकवली ते गोवा या कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक युवक, युवती तसेच व्यावसायिक कामानिमित्त प्रवासी दररोज गोवा राज्यात ये-जा करीत असतात. सध्या बहुतांश प्रवास महामार्गाने केला जातो. त्यामुळे प्रवासासाठी अधिक वेळ लागतो तसेच वाढती वाहतूक व अपघातांचा धोका यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. रेल्वे प्रवास हा सुरक्षित, वेळेची बचत करणारा आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा पर्याय आहे. त्यामुळे कणकवली ते गोवा या मार्गावर MEMU (Mainline Electric Multiple Unit) वीजेवर चालणारी लोकलसदृश प्रवासी ट्रेन सुरू करण्यात यावी.
ही सेवा सुरू झाल्यास विद्यार्थी, नोकरदार युवक-युवती, व्यापारी, कामगार आणि सर्वसामान्य ग्रामस्थांना मोठा फायदा होईल. तसेच महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल आणि सिंधुदुर्ग व गोवा यांतील दैनंदिन संपर्क अधिक सुलभ होईल.तरी प्रवाशांची गरज व सार्वजनिक हित लक्षात घेऊन कणकवली ते गोवा या मार्गावर MEMU ट्रेन सेवा लवकरात लवकर मुरू करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी अशी मागणी लोरे घोणसरी प. स. सदस्या मानसी बाळकृष्ण मराठे यांनी केली आहे