फोंडाघाट : एक नागरिक म्हणून निसर्गाच्या देणगीचे संरक्षण करा- डॉ. पुरंधर नारे

शेअर करा

राष्ट्रीय वन शहीद दिनाचे औचित्य साधून भूगोल विभागाच्या वतीने वन्य जीवांच्या जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न

फोंडाघाट: ११ सप्टेंबर २०२६
कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट मधील भूगोल विभागाच्या वतीने राष्ट्रीय वन शहीद दिन साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजाराम पाटील यांनी भारतातील आरण्य उद्याने अभयारण्य यांचे महत्त्व व वितरण याविषयी सविस्तर माहिती दिली. भारतासारख्या देशांमध्ये संसाधनांचे साम्राज्य आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आरण्यांची भूमिका देखील महत्त्वाची असते. आज देशामधील ताडोबा, चांदोली, राधानगरी, रणथंबोर, गीर, जिम कॉर्बेट, नंदनकान्हा, सुंदरबन, काझीरंगा, बांदीपूर अशी प्रमुख उद्याने व अभयारण्ये असून तेथे वन्य प्राण्यांचे संरक्षण केले जाते. यासाठी वन कर्मचारी रात्रंदिवस विविध प्राण्यांचे सोबती असतात. त्यांची प्रामाणिकपणे देखभाल करतात. स्वतःचा जीव धोक्यात घालून वन कर्मचारी पर्यावरण आणि वन्यजीवांचे संरक्षण करत आपले योगदान देत असतात. परंतु सर्व उद्याने, जंगले, अभयारण्य यांचे संरक्षण करत असताना काही वन कर्मचारी प्राण गमावतात. म्हणून संपूर्ण भारतातील जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ज्या वन कर्मचाऱ्यांनी आपले प्राण गमावले, त्यांच्यासाठी हा २०१३ पासून राष्ट्रीय वन शहीद दिन साजरा केला जातो.
अध्यक्ष भाषणामध्ये प्राचार्य डॉ. पुरंधर नारे म्हणाले, निसर्गाची देणगी म्हणजे साधन संपत्ती होय. वनस्पतींचे आच्छादन हा पर्यावरणातील प्रमुख घटक आहे, कारण यांमध्ये अनेक प्राण्यांचा अधिवास असतो. म्हणून वन्यजीवांसाठी उद्याने व जंगले महत्वाची ठरतात. निसर्गाच्या देणगीचे संरक्षण एक नागरिक म्हणून जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे, त्याचबरोबर वन्यजीव आणि अरण्य यांचे महत्त्व समाजाला समजावून सांगितले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले.
शेवटी कुमारी संगीता शेळके हिने सर्वांचे आभार मानले.

शेअर करा