विद्यार्थ्यांच्या फीचा बांधकामासाठी गैरवापर होत असल्याचा आरोप; आवश्यक मंजुरीशिवाय भूमिपूजनाचा निर्णय घेतल्याचा दावा, तहसीलदार व पोलिसांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा.
फोंडाघाट,दि.१५ जुलै(संजय सावंत)
फोंडाघाट महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम करण्याबाबत माजी चेअरमन संजू आपटे यांनी कार्यकारी मंडळाच्या सभेत विरोध दर्शवला असताना, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फी ची रक्कम कोणत्याही परिस्थितीत बांधकामासाठी बेकायदेशीर रित्या वापरू नये अशा सक्त सूचना प्राचार्य सह पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या असताना सदर इमारतीचे बांधकाम करण्यासाठी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा, कार्यकारी मंडळाची सभा तसेच महाविद्यालयाच्या विकास समितीमध्ये आवश्यक ती परवानगी न घेता खोटी माहिती देऊन सदरचे बांधकाम करण्याचा मनमानी घाट घातला आहे. यामध्ये घाईघाईत विद्यमान संचालकांपैकी काही संचालकांना अंधारात ठेवून १५ जुलै रोजी भूमिपूजन करण्याचे ठरविले आहे. त्या विरोधात माजी चेअरमन संजू आपटे यांनी १५ जुलै रोजी महाविद्यालयात लाक्षणिक उपोषणासाठी सहकाऱ्यांसह बसणार असल्याचे निवेदन तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना दिले आहे.