सावंतवाडी: वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे चौकुळ गाव गेल्या ६ दिवसांपासून अंधारात…

शेअर करा

जनआंदोलनाचा इशारा


​सावंतवाडी, दि. ९ जुलै

सावंतवाडी तालुक्यातील चौकुळ गाव गेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे अंधारात असून, महावितरणच्या (वीज वितरण कंपनी) मनमानी आणि ढिसाळ कारभारामुळे ग्रामस्थांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते ब्रह्माजी गावडे यांनी केला आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
​सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, चौकुळ गावातील वीज पुरवठा सलग सहा दिवस खंडित राहिल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज गायब होण्यामागे झाडे पडणे, खांब कोसळणे किंवा वायर तुटणे अशी जुनीच कारणे महावितरणकडून सातत्याने दिली जात आहेत. या पार्श्वभूमीवर, पावसाळा सुरू होण्यापूर्वीच वीज वाहिनीला अडथळा ठरणारी झाडे व फांद्या का तोडल्या गेल्या नाहीत? यासाठी येणारा निधी नक्की जातो कुठे? असा संतप्त सवाल ब्रह्माजी गावडे व चौकुळमधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
​दोन दिवस वीज बिल भरण्यास उशीर झाला की तात्काळ वीज कनेक्शन कापण्यासाठी वायरमन पाठवणारे प्रशासन, सहा-सहा दिवस गाव अंधारात असताना दुरुस्तीसाठी तत्परता का दाखवत नाही, असा सवाल करत महावितरणच्या या दुटप्पी भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. व्यवसाय आणि समाजसेवा या दोन्ही माध्यमातून कार्यरत असणारे ब्रह्माजी गावडे यांनी या समस्येबाबत प्रशासनाला धारेवर धरले असून, पुढील दोन दिवसांत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास चौकुळवासीय रस्त्यावर उतरतील, असा इशारा दिला आहे.

शेअर करा