​सावंतवाडी : गणेशोत्सवापूर्वी मळगाव बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडवा…

शेअर करा

शरद धाऊसकरांची मागणी;ॲम्बुलन्स अन् विद्यार्थ्यांना ट्रॅफिकचा फटका…

​सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट

मळगाव बाजारपेठेत दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक, नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येवर तात्काळ योग्य ती उपाययोजना करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी ट्रॅफिक पोलीस तैनात करावा, अशी मागणी पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर यांनी सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत केली.​या मागणीची गांभीर्याने दखल घेत, मळगाव बाजारातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच याबाबत सावंतवाडी पोलिसांना निवेदन दिले जाईल, असे आश्वासन सभापती सुस्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी बैठकीत दिले.


​मळगाव बाजारपेठेत सध्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहनांची वर्दळ अधिकच वाढणार असल्याचे शरद धाऊसकर यांनी स्पष्ट केले. मळगाव किंवा परिसरातून गंभीर रुग्णाला उपचारासाठी सावंतवाडीत आणायचे असल्यास वाहतूक कोंडीमुळे ॲम्बुलन्सलाही अडकून राहावे लागते, तसेच शाळेत जाणाऱ्या-येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या ट्रॅफिकचा मोठा फटका बसत आहे. नागरिक व रुग्णांचे हाल थांबवण्यासाठी प्रशासनाने आणि पोलीस विभागाने तत्काळ निर्णय घेऊन मळगाव बाजारपेठेत ट्रॅफिक पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.

शेअर करा