माडखोल धवडकी येथील भाड्याच्या खोलीत घटना; पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद
सावंतवाडी दि.१६ ऑगस्ट
आंबोली वन परिमंडळात केसरी वनरक्षक पदी कार्यरत असलेल्या आश्लेषा सागर मांगले ( २२ वर्ष )रा. आजरा या युवतीने माडखोल धवडकी येथील भाड्याच्या खोलीत रविवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण उशिरा पर्यंत समजू शकले नाही. पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तीन वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग वन खात्यामध्ये आश्लेषा मांगले या वनरक्षक पदावर सेवेत रुजू झाल्या होत्या. त्यांच्यावर आंबोली वन परिक्षेत्रातील केसरी वनरक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्या माडखोल धवडकी येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. रविवारी सुट्टी असल्याने दिवसभर घरातच होत्या तर उशिरा पर्यंत बाहेर न आल्याने घरमालक श्री. गोवेकर याना संशय आला त्यांनी दरवाजा ठोठावला मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्यांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस ठाण्यात कळविण्यात आले. सहा पोलीस निरीक्षक हर्षद हिंगे, पो उपनिरीक्षक माधुरी मुळीक पोलीस महेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी वनखात्याचे अधिकारी यांनाही पाचारण करण्यात आले. वनविभागाचे देवसू येथील अधिकारी यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस ठाण्यात घरमालक पूजा गोवेकर यांनी खबर दिली त्यावरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पो उपनिरीक्षक माधुरी मुळीक करत आहेत.
आश्लेषा सागर मांगले मुक्काम पोस्ट लाकूडवाडी तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर येथील असून शिक्षण बीएससी पर्यंत झाले आहे तर तीन वर्षांपूर्वी वनखात्यामध्ये वनरक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे.